आता यशस्वी मुंबईसाठी खेळणार

गेल्या वर्षी कसोटीत 1478 धावा आणि टी-20 मध्ये 293 धावा करणाऱया यशस्वी जैसवालला दमदार फलंदाजीनंतरही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदुस्थानी संघात स्थान मिळू शकले नाही. त्यामुळे हिंदुस्थानच्या धडाकेबाज फलंदाजाने येत्या 17 फेबुवारीपासून विदर्भाविरुद्ध सुरू होणाऱया रणजी करंडकाच्या उपांत्य लढतीत खेळणार असल्याचे मुंबई क्रिकेट संघटनेला कळवले आहे. हिंदुस्थानने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघात यशस्वीची राखीव खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली होती. त्यामुळे तो रणजी करंडकात खेळण्याची शक्यता नव्हती. मात्र काल नव्याने जाहीर केलेल्या संघनिवडीतून यशस्वीला वगळण्यात आल्याने आता तो मुंबईसाठी उपलब्ध झाला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक 36 षटकारांचा विश्वविक्रम रचणाऱया यशस्वीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही संधी मिळणे अपेक्षित होते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळताना त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही पदार्पण केले होते, पण तो अनपेक्षितपणे काही वशिल्याच्या खेळाडूंना संधी मिळावी म्हणून राखीव खेळाडूंच्या यादीत फेकला गेला.