46 वर्षे अभेद्य असलेला सिडनीचा किल्ला ढासळणार? डब्ल्यूटीसीचे आव्हान जिवंत राखण्यासाठी हिंदुस्थानला सिडनीत शेवटची संधी

सिडनीच्या मैदानावर हिंदुस्थानचा संघ आतापर्यंत 13 कसोटी खेळलाय, पण विजय फक्त 1978 च्या कसोटीतच मिळवता आला आहे. हिंदुस्थानला जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) शर्यतीतील आपले आव्हान जिवंत राखायचे असेल तर गेली 46 वर्षे अभेद्य असलेला ऑस्ट्रेलियाचा सिडनी किल्ला भेदावाच लागणार आहे. हिंदुस्थानला नववर्षाच्या पहिल्याच कसोटीत आपले सर्वस्व पणाला लावून खेळावे लागणार आहे. हिंदुस्थानसाठी डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवायचे असेल तर सिडनी जिंकण्यावाचून पर्याय नाही.

सोमवारी एमसीजीवर झालेल्या पराभवानंतर हिंदुस्थानचे डब्ल्यूटीसीतील आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. केवळ एक अंधुक आशा उरली आहे, ती म्हणजे श्रीलंकेला मायदेशात होणाऱ्या दोन कसोटींच्या मालिकेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारावी लागणार आहे. श्रीलंकेने हा चमत्कार घडवला तरच हिंदुस्थानचे आव्हान कायम राहील. हे कठीण नसले तरी हे आता आपल्या हातात राहिलेले नाही. आता हिंदुस्थान बॉर्डर-गावसकर (बॉगाक) करंडक मालिका जिंकू शकत नसला तरी सिडनी कसोटी विजय मिळवून मालिका बरोबरीत सोडवू शकतो. परिणामतः गतविजेता म्हणून बॉर्डर-गावसकर करंडकाला हिंदुस्थान आपल्याकडेच राखण्यात यश मिळवेल.

गेल्या दौऱयातला स्फूर्तिदायक सामना

हिंदुस्थानने सिडनीवर कसोटी विजय मिळवून चार दशके लोटली असली तरी 2021 साली सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाच्या 407 धावांचा पाठलाग करण्याचा झुंजार प्रयत्न केला होता. आधी या सामन्यात हिंदुस्थान विजयासाठी खेळत होता, पण आक्रमक ऋषभ पंतच्या 97 धावांच्या आक्रमक खेळीचा शेवट होताच हिंदुस्थान संघ विजय सोडून सामना अनिर्णित राखण्यास धडपडू लागला. पंतनंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विनने 42 षटके किल्ला लढवत सामना अनिर्णित राखला होता. हा सामना हिंदुस्थानी संघासाठी निश्चित स्फूर्तिदायक आहे. विशेष म्हणजे पंतने तडाखेबंद खेळ करत हिंदुस्थानला विजयाची स्वप्ने दाखवली होती, पण ती प्रत्यक्ष साकारता आली नाहीत. हा कसोटी सामना अनिर्णित झाल्यामुळे हिंदुस्थानने सिडनीवर सलग तिसरा कसोटी सामना ड्रॉ राखला होता.

सिडनीवर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व

सिडनी म्हणजे एससीजीवर ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानविरुद्ध पाच विजय नोंदवले आहेत तर केवळ एकाच सामन्यात ते हरलेत आणि उर्वरित सात सामने अनिर्णितावस्थेत संपलेत. यजमानांनी आपल्या पाचपैकी तीन सामन्यांत हिंदुस्थानचा डावाने पराभव केली, हे विशेष. 2012 साली ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा डाव आणि 68 धावांनी पराभव केला होता. म्हणजे 2012 नंतर हिंदुस्थान सिडनीवर हरलेला नाही आणि ऑस्ट्रेलिया जिंकलेला नाही. गेल्या तिन्ही मालिकेत सलग तीन कसोटी सामने अनिर्णितावस्थेत सुटलेत. ज्यात हिंदुस्थानने जोरदार कामगिरी केली होती.

आव्हान जिवंत राखण्याची शेवटची संधी

अडीच महिन्यांपूर्वी हिंदुस्थानने 11 कसोटी शामन्यांत 8 विजय मिळवत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान संपादले होते. मात्र त्यानंतर झालेल्या सात कसोटींपैकी पाच कसोटीत हार सहन करावी लागल्याने हिंदुस्थानचे डब्ल्यूटीसीमधील आव्हान डळमळीत झाले आहे. हिंदुस्थानसाठी डब्ल्यूटीसीचा अंतिम फेरीचा मार्ग अत्यंत सोपा मानला जात होता. मात्र गेल्या अडीच महिन्यांत हिंदुस्थानी संघाच्या झालेल्या घसरगुंडीमुळे सारे काही बदलले आहे. आता हिंदुस्थानला सिडनी कसोटी जिंकून मालिका बरोबरी राखता येईल आणि त्यानंतर श्रीलंकेकडून चमत्काराची वाट पाहावी लागणार आहे. हे सारे जरतरवर अवलंबून आहे.