इंग्लंडने न्यूझीलंडचा केला पराभव, टीम इंडियाच्या गोटात आनंदाचे वातावरण; WTC Final चा मार्ग झाला सोपा

बॉर्डर गावस्कर करंडकातील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबर पासून एडलेडमध्ये सुरू होणार आहे. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. अशातच टीम इंडियासाठी आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इंग्लंडने न्यूझीलंडचा पहिल्या कसोटी सामन्यात पराभव केला आहे. त्याच बरोबर या सामन्यानंतर दोन्ही संघांना एक मजबूत धक्का बसलाय. त्यामुळे टीम इंडियाचे जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या (WTC) अंतिम सामन्यात जाण्याचे समीकरण थोडे सोपे झाले आहे.

टीम इंडियाने पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा दुसरा सामना पिंक बॉलवर एडलेडमध्ये दिवस-रात्र स्वरुपात 6 डिसेंबर पासून खेळवला जाणार आहे. WTC फायनलच्या दृष्टीने टीम इंडियासह ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. दुसरीकडे इंग्लंड आणि न्यूझीलंड हे संघ सुद्धा या शर्यतीमध्ये असून त्यांच्यामध्ये सुद्दा कसोटी मालिका सुरू असून पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकला. त्यामुळे टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी आहे. त्याच बरोबर या सामन्यात स्लो ओव्हर टाकल्यामुळे दोन्ही संघांनी ICC च्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ICC ने न्यूझीलंड-इंग्लंड या सामन्यावर मॅच फीच्या 15 टक्के इतका दंड ठोठावला आहे. तसेच WTC च्या अनुषंगाने दोन्ही संघांचे 3 गुण वजा करण्यात आले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला याचा फायदा होणार आहे.

पर्थ कसोटी सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला WTC फायनलमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला 4-0 अशा फरकाने हरवणे गरजेचे होते. मात्र आता 3-0 अशा फरकाने टीम इंडियाने मालिका जिंकली तरी चालणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला पुढील चार कसोटी सामन्यांपैकी 2 कसोटी सामने जिंकने अनिवार्य आहे.