>>मंगेश दराडे
चारकोप विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार योगेश सागर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार यशवंत सिंह आणि मनसेचे दिनेश साळवी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात सलग 15 वर्षे भाजपचा आमदार असूनही अनेक समस्या ‘जैसे थे’ आहेत. स्थानिक रहिवाशांच्या नाराजीमुळे यंदाची निवडणूक विद्यमान आमदार योगेश सागर यांच्यासाठी सोपी नाही असेच चित्र दिसतेय.
चारकोप विधानसभा मतदारसंघात मालवणी गाव, जनकल्याण नगर, एकता नगर, महावीर नगर, गणेश नगर आदी भागांचा समावेश होतो. पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. तेव्हापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार योगेश सागर करीत आहे. चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांना ‘काँटे की टक्कर’ देण्यासाठी महाविकास आघाडीने यशवंत सिंह यांच्या रूपाने एक उच्चशिक्षित उमेदवार दिला आहे. यशवंत सिंह शिक्षक असल्याने शिक्षणावर त्यांचा फोकस असून निवडून आल्यावर विभागात शासकीय मेडिकल आणि इंजिनीअरिंग कॉलेज उभारण्यावर त्यांचा भर असणार आहे. याशिवाय रखडलेले एसआरए प्रकल्प मार्गी लावणे, विभागात मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणे हे त्यांचे व्हिजन आहे.
रखडलेले एसआरए प्रकल्प, तिवरांवर अतिक्रमण
चारकोपमधील बैठय़ा चाळींच्या पुनर्विकासासाठी आमदारांनी प्रयत्न केले नाहीत. एकता नगर, गणेश नगर येथील अनेक एसआरए प्रकल्प रखडले आहेत. घर नाही आणि भाडेही नाही अशी रहिवाशांची अवस्था आहे. तिवरांच्या जंगलावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. नाले आणि गटारांच्या अर्धवट कामांमुळे पावसाळ्य़ात नागरिकांच्या घरात तसेच रस्त्यावर पाणी साचते. कोळी बांधवांसाठी विद्यमान आमदारांनी काहीच केले नाही. गेल्या 40 ते 50 वर्षांपासून अभिलाख नगर येथे राहणाऱ्या 1260 झोपडपट्टीवासीयांना माहुल येथे शिफ्ट केले जाणार आहे. त्यामुळे त्यांचाही रोष आमदार योगेश सागर यांच्याविरोधात आहे.
मराठी मतांचे गणित जुळणार
चारकोप विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 17 हजार 416 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 71 हजार 006 पुरुष, 1 लाख 46 हजार 392 महिला आणि 18 तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघात मराठी, गुजराती, उत्तर भारतीय आणि मुस्लिम असे संमिश्र मतदार आहेत. अल्पसंख्याक आणि उत्तर भारतीय यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. चारकोपमधील मराठी मतदारांची मते निर्णायक भूमिका बजावणार आहेत. मनसेचा या मतदारसंघात फारसा जोर नाही. शिवसेनेमुळे मराठी मतदारांची मते महाविकास आघाडीच्या पारडय़ात पडतील, अशी चर्चा आहे.
कांदिवली औद्योगिक वसाहतीचा मुद्दा पेटणार
116 एकरवर पसरलेल्या कांदिवली औद्योगिक वसाहतीमध्ये 350 पंपन्या आहेत. येथील पंपन्यांमध्ये काम करणारे 22 हजार 500 कामगार आजूबाजूच्या परिसरातच राहतात. या औद्योगिक वसाहतीची जागा पुन्हा सरकारच्या ताब्यात घेऊन येथील उद्योजकांना विस्थापित करण्याच्या डाव महायुतीने आखला आहे. त्यामुळे उद्योजक आणि कामगारांमध्ये महायुतीविरोधात असंतोषाचे वातावरण असून त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला आहे.