मनतरंग – स्वाभिमान!

>>दिव्या नेरुरकर-सौदागर

आयुष्यातील आव्हानांमध्ये अडकून न पडता ती स्वीकारून योग्य त्या मार्गाने पुढे जायचे असते. गतकाळातील नकारात्मक आठवणींत रमत वर्तमानातली बदललेली परिस्थिती नजरेआड करणे हे अतार्किक आहे. अशा वेळी स्वतबद्दलचा ‘पुअर वी’ दृष्टिकोन सोडून आत्मविश्वासाने पुढे जात राहणे हेच योग्य ठरते.

चिरायू आणि हेतल (नावे बदलली आहेत) हे बहीण – भाऊ समुपदेशनाकरिता येणार होते. दोघेही अंदाजे वीस ते पंचविशीच्या घरातील होती. हेतल मोठी तर चिरायू धाकटा होता. बोलायला सुरुवात कशी आणि कुठून करावी हे ठरवण्यात दोघांचाही वेळ जात होता. शेवटी हेतलने घसा खाकरत बोलायला सुरुवात केली. ‘मॅम, आम्ही दोघं भावंडं मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो आहोत. मी सध्या एका खासगी कंपनीत कामाला लागले आहे. चिरायू आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे. तोही पार्ट टाइम जॉब करतो आहे.’ अशी सुरुवात करत तिने समुपदेशनासाठी येण्याचे कारण सांगायला सुरुवात केली. ‘आम्हाला दोघांनाही आत्मविश्वासाची कमतरता असल्याचं जाणवायला लागलं आहे. विशेषतः कामाच्या ठिकाणी हे जास्तच जाणवायला लागलं आहे. चिरायू त्याला होणाऱया त्रासाबद्दल सांगेलच तुम्हाला.’ एवढे बोलून हेतल शांत बसली.

तिचे बोलणे सुरू असताना चिरायूच्या हाताच्या बोटांची अस्वस्थ हालचाल चालू होतीच. तिचे बोलणे संपल्यावर त्याने बोलायला सुरुवात केली. ‘मॅम, ताई म्हणतेय ते खरं आहे. मागच्या आठवडय़ात मला माझ्या बॉसला भेटायचं होतं. मला कॉलेजच्या अभ्यासासाठी दोन दिवस रजा हवी होती. पण, मला ते विचारतानाही इतकं टेन्शन आलं की त्यात मी बॉसची परवानगी घेतलीच नाही. सरळ दोन दिवस सुट्टी घेतली. आता आमचं कुरिअर सेवा ऑफिस आहे. आम्ही सर्व मुलं ऑफिसमध्ये आणि बाहेर कुरिअर पोहोचवणं अशी आळीपाळीने कामं करत असतो. माझ्या त्या दोन दिवसांच्या दांडीमुळे खूप प्रॉब्लेम्स झाले. शिवाय बॉसचा ओरडा मिळाला तो वेगळाच.’

‘बरं. पण मला सांग, हा असा भिडस्तपणा पहिल्यापासूनच तुझ्यात आहे का?’ असं विचारताच चिरायूने होकारार्थी मान हलवली.

ह्या दोन्ही भावंडांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या आई-वडिलांचे स्वभाव हे अत्यंत मितभाषी होते. ती दोघेही कधीच कोणाचा विरोध करत नसत. त्यांची सांपत्तिक स्थिती तशी काही चांगली नव्हती. त्यामुळे आई संसाराला हातभार म्हणून चार घरी पोळ्या करायला जायची. वडील एका छोटय़ा कारखान्यात कारकून होते. त्यामुळे त्या कुटुंबाला काटकसरीची सवय होती. या कारणाने हे कुटुंब इतर नातेवाईकांसाठी चेष्टेचा विषय बनले होते आणि त्याचा परिणाम ह्या दोन्ही भावंडांच्या मानसिकतेवर झाला होता.

‘आमच्याकडे बाहेर जायचे कपडे जास्त नव्हते. तेचतेच जोड आम्ही वापरायचो. लग्न समारंभांनासुद्धा ठेवणीतले तीन जोड होते.’ हेतल सांगत होती.

‘माझ्याकडे तर एकच जीन्स होती. कॉमन ब्लू कलर होता. त्यावर बरेच शर्ट घातले मी.’ चिरायू विषादाने म्हणाला. ‘सगळ्या ठिकाणी तेच कपडे घालून जायचो आणि आमची इतर चुलत भावंडे आम्हाला चिडवायची. आई-बाबा हसून दुर्लक्ष करायचे.’ तो पुढे सांगत होता. ‘आता आमची चुलत भावंडं आम्हाला चिडवत नाहीत. पण आता त्याची जागा अनुकंपेने घेतली आहे. त्यांचं ते सतत आमची कीव करत बघत राहणं आम्हाला त्रास देत राहतं.’ चिरायूने मनावर झालेला घाव सांगत समुपदेशनाच्या दिशेला वाट मोकळी करून दिली.

कधीकधी प्राप्त परिस्थितीत त्या व्यक्तीच्या वाटय़ाला जर अपमान, अवहेलना अथवा कीव सतत आलेली असेल तर ह्या गोष्टी संवेदनशील व्यक्तीच्या स्वाभिमानाला खूप दुखावून जाऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे हेतल-चिरायू ही दोन भावंडे होती. त्यांचा दुखावलेला स्वाभिमान पुन्हा जागृत करणे आणि त्यांचा गेलेला आत्मविश्वास पुन्हा आणणे हे समुपदेशनाचे मुख्य उद्दिष्ट होते.

सुरुवातीला त्या दोघांचीही वैयक्तिक सत्रे घेण्याचे ठरले. ज्यामध्ये त्यांच्या गतयुष्यातील कटू आठवणी त्यांना विचारण्यात आल्या आणि त्यांनी त्या आठवणींचा काय अर्थ लावला होता हेही त्यांना विचारण्यात आले. त्यांच्याशी बोलताना असे समजले की मोठय़ा नातेवाईकांची त्यांच्या आईवडिलांशी पैशांच्या संदर्भातील काळजी ही त्या मुलांसाठी ‘दया दाखवण्यासारखी’ होती. त्यामुळे चुलत भावंडांचे लहानपणी त्यांना चिडवले जाणे हे त्यांनी ‘त्यांचा अपमान’ म्हणून घेतले होते आणि अजूनही ती दोघं त्याच समजात वावरत असल्यामुळे त्या दोघांचे त्यांच्या चुलत भावंडांशी नाते तेवढे चांगले नव्हते.
‘आता ती भावंडं अजूनही तुम्हाला असंच चिडवत राहतात का?’ असा प्रश्न करताच हेतल ‘नाही’ असे म्हणाली.

‘आता आम्ही दोघं त्यांना चान्स देत नाही. आम्ही दोघंही कमावतोय आणि आता असं कमवायचं की कोणी आम्हाला किंवा आमच्या आईबाबांना देण्याची वेळ कधीही येऊ नये.’ अशी पुष्टी तिने पुढे जोडली. मग थोडे थांबून म्हणाली, ‘आता तशीही सगळीजण समंजस झाली आहेत. आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. पण… आम्हाला तेवढी इच्छा नाही होत.’ चिरायू म्हणाला.

‘आता तुझा राग बोलतो आहे, चिरायू… हो ना?’ असं त्याला लक्षात आणून दिल्यावर तो पटकन उत्तरला, ‘हो.’

‘हा राग तुझं नुकसान करतोय का?’ असा प्रतिप्रश्न त्याला केल्यावर तो विचारात पडला. ‘हो. त्यामुळे मी बऱयाच फॅमिली फंक्शन्सना गेलेलो नाही आणि मला तर फॅमिलीमध्ये जावं असंसुध्दा वाटत राहतं.’ त्यांच्या स्वतचा आडमुठेपणा त्यांना भूतकाळात रमायला लावून वर्तमानातली बदललेली परिस्थिती नजरेआड करायला लावत होता.

‘थोडं असा विचार आपण केला तर… त्या सर्वांमुळेच तुम्हाला पुढे जाण्याची ऊर्मी मिळाली आणि तुम्ही आता तुमच्या आयुष्यात स्थिरस्थावर होत आहात.’

‘पण मॅम, त्या सर्वांमुळेच आमचा आत्मविश्वास हलला होता.’ चिरायू पटकन म्हणाला.
‘आत्मविश्वास गेला तो यांच्यामुळे, की तुमच्या दोघांच्या सतत तोच नकारात्मक विचार करण्यामुळे? तू तुझ्या बॉसशी बोलू शकला नाहीस. तो बॉस तर तुझा नातेवाईक नाही. मग त्याच्याशी तुला बोलायला का नाही जमलं?’ चिरायू आता शांत झाला.

‘कारण, तू मी कुठेतरी कमी आहे. कारण मी गरीब आहे आणि मला कायम ऐकून घ्यावं लागेल अशा अतार्किक विचारपद्धतीत स्वतला गुंतवून ठेवलं आहेस. त्यामुळे तुला स्वतची बाजू मांडताना आता अडचणी येत आहेत. तेव्हा तुम्ही दोघांनीही ‘पुअर वी’ दृष्टिकोन सोडलात तर पुढे जाऊन स्वतची बाजू मांडू शकाल. आपल्या सगळ्यांनाच आयुष्यात अशी आव्हानं येत असतातच. त्यांच्यामध्ये असं अडकून न पडता ती स्वीकारून योग्य त्या मार्गाने पुढे जायचं असतं. तुम्ही दोघांनीही त्वेषाने ठरवलंत आणि त्याप्रमाणे कमवायला सुरुवात केलीही. आता जो काही राग आहे तो एकदा भावंडासमोर व्यक्त करू शकता नि त्याला पूर्णविराम तुम्हीच देऊ शकाल. करू शकाल का?’

हेतल आणि चिरायूच्या चेहऱयावर आता हसू उमटलं. ‘आम्ही करू शकू’ हा आत्मविश्वास त्यावेळी त्या दोघांच्याही डोळ्यांत दिसला.

[email protected] (लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)