वार्तापत्र मानखुर्द-शिवाजीनगर – मानखुर्दमध्ये महाविकास आघाडीचाच बोलबाला

>>आशीष बनसोडे

मुंबईच्या पूर्व उपनगरातील मानखुर्द-शिवाजीनगर हा मतदारसंघ सध्या हॉट बनला आहे. मुस्लिम बहुल परिसर असलेला हा मतदारसंघ जिंकण्यासाठी यावेळी जोरदार लढाई बघायला मिळणार आहे. गेले तीन टर्म या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे समाजवादी पक्षाचे अबू आसिम आझमी हे चौथ्यांदा विजयी होण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. तर अजित पवार गटाचे नवाब मलिक यांनी आझमींसमोर आव्हान उभे केले  आहे. तब्बल 22 उमेदवार याठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. असे असले तरी एपंदर जनतेचा कल पाहता मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवारच विजयाचा झेंडा फडकवणार असेच चित्र आहे.

मानखुर्द-शिवाजी नगर हा मुस्लिम बहुल परिसर असला तरी  बौद्ध व इतर मागासवर्गीयांची वस्ती देखील लक्षणीय आहे. हा मतदारसंघ बहुतकरून झोपडपट्टीने व्यापलेला आहे. शिवाय बैंगणवाडी व परिसरात म्हाडा तसेच खासगी विकासकांच्या माध्यमातून पुनर्विकासालाही चालना मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय दीना पाटील यांना या मतदारसंघातून 90 हजारचा लिड मिळाला होता. सवा तीन लाख मतदार संख्या असलेल्या या मतदारसंघात सध्या महाविकास आघाडीचाच बोलबाला आहे.  भाजपा आणि त्यांची महायुती आम्हाला नको असाच सूर तेथील मतदारांमधून आळवला जात आहे. अबू आझमी, नवाब मलिक यांच्याबरोबरच मनसे , मिंधे गटाचे, तसेच अन्य अशा 22 उमेदवारांनी या मतदारसंघातून नशीब अजमाविण्यासाठी दंड थोपटले आहेत. पण वास्तविक स्थिती पाहता धर्मनिरपेक्ष व मुस्लिम मतदार हा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना कुठलीही सामाजिक तेढ, तंटा झाला नाही. ठाकरे सरकारने समान न्याय, सर्वांचा विकास हे धोरण राबविले. त्यामुळे आमचे मत उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीलाच  असा वज्र निर्धार येथील मतदारांनी केलेला दिसतो.

बाकी सर्वांची विकेट जाणार

मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात अबू आझमी यांनी पंबर कसली आहे. तर अणुशक्ती नगर मतदारसंघाचे आमदार नवाब मलिक यांनी यावेळी मतदारसंघ बदलून ते मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये आपले नशीब अजमवणार आहेत. दोन्ही नेते तगडे असून दोघेही मुस्लिम आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील मुस्लिम मतदारांमध्ये विभागणी होईल अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.  असे जरी असले तरी महाविकास आघाडीला मिळणारा पाठिंबा लक्षात घेता महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडूण येणार असा तेथील कल दिसतो. 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यापैकी 13 उमेदवार हे अपक्ष आहेत.

ड्रग्जची डोकेदुखी

मुंबई शहरातील संवेदनशील ठिकाणांपैकी मानखुर्द-शिवाजीनगरचा परिसर मानला जातो. बहुत करून झोपडपट्टी असलेल्या या परिसरात ड्रग्जची मोठी डोकेदुखी आहे. या ठिकाणी बेरोजगारी, शिक्षण याबरोबर ड्रग्जचा प्रश्न जटिल आहे. वेळोवेळी हे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले गेलेत. पण त्यासाठी आणखी ताकद लावण्याची आवश्यकता असल्याचे चित्र आहे.