>>अमर मोहिते
वर्सोव्यातील अल्पसंख्याक मतदारांची संख्या व शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भक्कम पक्कड यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलीच धूळ चारून येथे मशाल धगधगेल, असा मजबूत अंदाज बांधला जात आहे.
या मतदारसंघात अल्पसंख्याक मतदारांची संख्या तब्बल 1 लाख 10 हजार आहे. त्यामुळे येथे अल्पसंख्याक उमेदवार द्यावा, अशी आग्रही मागणी येथील मुस्लिम समाजाने केली होती. त्यानुसार येथून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हारुन खान यांना उमेदवारी दिली. हारुन खान हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांनी येथील मतदारसंघात चांगली बांधणी केली आहे.
महायुतीकडून येथील भाजपच्या विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन टर्म त्या भाजपच्या आमदार राहिल्या आहेत. असे असले तरी गेली 30 वर्षे हारुन खान येथे निष्ठेने शिवसेनेचे काम करत आहेत. गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख असा त्यांचा शिवसेनेतील प्रवास आहे. त्यांची पत्नी शायदा खान या 2017 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. एपंदरीतच येथील शिवसेना व हारुन खान यांचे वर्चस्व भाजपच्या उमेदवार लव्हेकर यांना चीतपट करणारे आहे.
भाजपमध्ये धुसफुस
2014 च्या निवडणुकीत भाजपने येथील जागा शिवसंग्राम पक्षासाठी सोडली होती. शिवसंग्राम पक्षाकडून लव्हेकर यांना संधी देण्यात आली. त्या विजयी झाल्या. 2019 मध्येही त्यांची आमदारकी कायम राहिली. मात्र या दहा वर्षांत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी लव्हेकर यांचे पटलेच नसल्याची चर्चा आहे. भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे संजय पांडे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. ऐनवेळी लव्हेकर यांची उमेदवारी जाहीर झाली. परिणामी भाजप कार्यकर्ते लव्हेकर यांच्यासाठी मैदानात उतरतील का याबाबतही साशंकता आहे.
काँग्रेस मतांचे पाठबळ
गेल्या विधानसभा निवडणुकीत भारती लव्हेकर यांना 41 हजार 057 मते मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार बलदेव खोसा यांना 35 हजार 871 मते मिळाली होती. महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेस एकत्र आहेत. येथील काँग्रेसची हक्काची मते हारुन खान यांच्या पाठीशी असतील.
भाजपबद्दल रोष
पह्डापह्डीच्या राजकारणामुळे येथील मतदारांमध्ये भाजपबद्दल प्रचंड रोष आहे. भारती लव्हेकर यांच्याबाबतही कमालीची नाराजी आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमदेवार हारुन खान यांचे पारडे जड आहे.
लोकसभेला 22 हजारांचे मताधिक्य
लोकसभा निवडणुकीला या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना 22 हजारांपेक्षा अधिक मते मिळाली होती. या मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून येथे दोन वेळा काँग्रेसचा, तर दोन वेळा भाजपचा उमेदवार निवडून आला आहे. भाजपच्या अंतर्गत वादाचा फायदा शिवसेना उमेदवाराला होणार असल्याची चर्चा आहे.