विज्ञान-रंजन – कृत्रिम बुद्धिमत्ता!

<<< विनायक >>>

‘जो तो बुद्धीचं सांगतो’ अशा आजच्या या जगात माणसागणिक निराळं मत, निराळं ‘तत्त्वज्ञान’ किंवा बदलती मतं आणि ‘बदलते तत्त्वज्ञान’ यांचा आलेला महापूर, माणूस नावाचा विचारशील प्राणी समूहाने, वस्ती करून राहू लागला तेव्हापासूनचा आहे… आणि माणूस म्हटलं की, तो (ती) विचार करणारच. कारण पृथ्वीवरच्या इतर सर्व सजीवात आणि माणसात असलेला फरक म्हणजे त्याची विचार करण्याची अमोघ शक्ती. ‘ह्युमन इज अ थिंपिंग एन्टिटी’ असल्याने माणसाची ही विचारशीलताच कधी त्याच्या प्रचंड प्रगतीला तर कधी भयावह उत्पातांनाही कारणीभूत ठरते हे जगाच्या इतिहासात अनेकदा नोंदलं गेलंय.

सद्बुद्धी आणि दुर्बुद्धीचं एकच उदाहरण द्यायचं तर अणुभंजनातून प्रचंड ऊर्जा निर्माण होते हे वरदान आणि अ‍ॅटम बॉम्ब टाकून हजारो लोकांचा एका क्षणात बळी जाणं हा शाप. दोन्ही गोष्टी माणसानेच केल्या. वैचारिक प्रगल्भता आली नाही तर, तर केवळ विचारशील असून भागत नाही तर ‘समाजशील’ही असणं ही माणसाचीच गरज आहे याचा विसर पडतो.

पृथ्वीवरच्या अनेक सजीवांना नैसर्गिक ऊर्मीतून आलेली (इन्स्टिंग्ट) बुद्धिमत्ता असते. मुंगी वारुळाची, मधमाशी पोळ्याची अद्वितीय रचना करते. परंतु लक्षावधी वर्षं त्यात बदल नसतो. नैसर्गिक परिस्थितीमुळे पुन्हा त्याच जैविक ऊर्मीनुसार काही बदल होतो पिंवा वनस्पती, प्राणी यांच्यात ‘म्युटेशन’ होऊन म्हणजे ‘आकस्मिक’ बदलाने नवीनच काही जन्म घेते. परंतु त्यामागे कृत्रिम प्रयत्न नसतात.

माणसाच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेने (नॅचरल इन्टेलिजन्स) निर्माण केलेली विविध प्रकारची गृहरचना, शिल्पकला, चित्रकला, गायनादि कला, शस्त्रास्त्र, यांत्रिक क्रांती, रासायनिक क्रांती, संगणकीय क्रांती या गोष्टी माणसाच्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या देणग्या आहेत. त्यातही गेल्या दोन-तीनशे वर्षांत त्याचा वेग एवढा वाढलाय की, अवकाशातून चंद्रावर उतरणं सोपं वाटावं असा पुढचा प्रवास वेग घेतोय.

रोबो, रोबोट काहीही म्हणा, त्याच्या संशोधनाने आज घर स्वच्छ करणारे आज्ञाधारी सफाईयंत्र आणि हव्या त्या प्रश्नांना उत्तर देणारी यंत्रंही वापरात आहेत. यापुढची पावलं म्हणजे चॅट जीपीटी आणि एआय अर्थात आर्टिफिशियल इन्टेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आपला प्रभाव दाखवू लागली आहेत. याचा गंध ज्यांना नसेल ते आजच संगणक-निरक्षर ठरतायत. उद्याचे सारे व्यवहार आणि एकूणच मानवी जीवन कदाचित ‘एआय’च्या ताब्यात जाणार आहे. त्याचे परिणाम नेमके काय होतील हे काळाच्या त्या त्या टप्प्यावर ठरणार. त्यातील उपकारक गोष्टींचा स्वीकार करताना, अपकारक गोष्टींना आळा कसा घालायचा, याचाही ‘विचार’ उद्या (किंवा आताच) ‘एआय’ करू लागेल.

मात्र त्याचे सुपरिणाम होतील की दुष्परिणाम, यावर आत्तापासूनच चर्चा सुरू झाली आहे. अशा चर्चा नव्या संशोधनाच्या प्रत्येक वळणावर होतच आल्या आहेत. मानवी स्वभावानुसारच कोणत्याही संशोधनाचं रूपांतर चांगल्या किंवा वाईट परिणामांमध्ये होणार हे सार्वकालिक सत्य आहे. म्हणजे इथे प्रश्न सद्संस्कृतीचा. माणसाने माणसाशीच नव्हे, सर्व निसर्गाशी सौहार्दाने वागायचं की या सगळ्यावर ताबा मिळवल्याच्या आनंदात (किंवा अहंकारात) बुडायचे, हेसुद्धा काळच ठरवणार.

या लेखात ‘एआय म्हणजे काय, त्याचा उगम कसा झाला, यावर फार चर्चा नाही. ते सर्वत्र उपलब्ध आहे. थोडक्यात सांगायचे तर याचा आरंभ अ‍ॅलन ट्युरिंग यांच्या ‘कॉम्प्युटिंग’ किंवा संगणकीय मांडणीपर्यंत मागे जावे लागेल. 0 आणि 1 यामधेच गणिती कार्यकारणभाव (मॅथॅमॅटिकल रिझनिंग) सामावण्याची ही भन्नाट संकल्पना. पुढे 1943 मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक मेंदू आणि ‘आर्टिफिशिल न्युटॉन्स’ची कल्पना मॅकक्लाऊच आणि विट् यांनी विकसित केली. त्यातून विविध प्रकारचं ‘प्रोग्रॅमिंग’ निर्माण झालं आणि गतिमान ‘विचार’ करणारं यंत्र म्हणून कॉम्प्युटरकडे जगाने पाहिलं.

आता त्याचा खूप पुढचा टप्पा आला आहे. 1947 मध्ये जन्मलेले जिऑफ्री एव्हरेस्ट हिन्टन हे ‘आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स’चे जनक (गॉडफादर) मानले जातात. त्यांना 2018 मध्ये ‘ट्युरिंग’ अ‍ॅवॉर्ड मिळालं आणि यंदा 2024 मध्ये यासाठीच जॉन हॉपफिल्ड यांच्यासह भौतिकशास्त्राचं जगप्रसिद्ध ‘नोबेल प्राइज’सुद्धा लाभलं. दुसरे जॉन हॉपफिल्ड हे ‘हॉपफिल्ड नेटवर्क’चे निर्माते. सध्या ते 91 वर्षांचे आहेत. त्यानाच आता ‘एआय’च्या अनिर्बंध विस्ताराची काळजी वाटतेय. 2023 च्या मार्चमध्ये त्यांनी ‘जीपीटी-4’ नंतर ‘जरा थांबा’ (पॉज घ्या) असा सल्ला या क्षेत्रातल्या लोकांना दिला. कारण उद्या या संशोधनावरची मानवी पकड नष्ट होण्याची (ह्युमन अ‍ॅबसोलेन्स) धास्ती त्यांना वाटते.

‘एआय’ची वेगवान दौड त्यांना भयावह (अन्नर्व्हिंग) भासते. असंच काहीसं अ‍ॅटम बॉम्बचा शोध लावणाऱ्या जे रॉबर्ट ओपेनहायमर यांनासुद्धा वाटलं होतं… पण म्हणून जग अण्वस्त्रमुक्त झालं? नाही! ‘एआय’च्या जनकांची व्यथा ‘ह्युमेन’ आहे, पण समस्त मानव समाज त्यांचं ऐकेल? शक्यता कमीच. महाभारताचं युद्ध सुरू होण्यापूर्वी व्यासमुनींनी सर्वांना थांबण्याची विनंती केली होती. कोणी ऐकेना. शेवटी हशात होऊन ते म्हणाले, ‘उर्ध्वबाहूविरौम्येष्य ना कश्चित शृणोति माम्।’ म्हणजे मी दोन्ही बाहू उंचावून काही सांगतोय, पण कोणी ऐकतच नाही. काळ बदललेला नाही. तो ‘सतत’च असतो. आताही नवनव्या संशोधनांचे बरे-वाईट परिणाम होणारच, कारण विवेकयुक्त विचार करणार कोण?