खान कुटुंबीयांना गेल्या काही दिवसांपासून धमकी येण्याचे प्रकार सुरूच आहेत. बॉलीवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान यांना धमकी दिल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुरुवारी दोघांना ताब्यात घेतले. सलीम खान हे बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकला बॅण्ड स्टॅण्ड येथे गेले होते.
वॉक करून थकल्याने एका इमारतीसमोरील कट्ट्याजवळ बसले होते. तेव्हा गॅलेक्सी येथून बॅण्ड स्टॅण्डच्या दिशेने दोघे जण मोटरसायकलवरून जात होते. स्कुटीवर एक बुरखाधारी महिला बसली होती. चालकाने स्कुटीचा यू टर्न घेतला. त्यानंतर ते लेखक सलीम खान यांच्याजवळ आले.
लॉरेन्स बिष्णोईला पाठवू का, अशा धमकीच्या स्वरूपात बोलून ते निघून गेले. धमकी दिल्यावर ते मोटरसायकलने वांद्र्याच्या दिशेने गेले. हा प्रकार स्पेशल प्रोटेक्शन युनिटच्या एका पोलीस हवालदाराच्या लक्षात आला. त्याने त्या मोटरसायकलचा नंबर नोंद केला. घडल्या प्रकाराची माहिती वांद्रे पोलिसांना दिली. सदर जोडपे हे मध्य मुंबईत राहते. बुधवारी सकाळी ते फिरण्यासाठी बॅण्ड स्टॅण्डला आले. तेव्हा त्याने मस्करी करण्याच्या उद्देशाने सलीम खान यांना धमकावल्याचे सूत्रांनी सांगितले.