कुस्तीपटू बजरंग पुनिया पुन्हा निलंबित, नियमांचे उल्लंघन केल्याने ‘नाडा’ची कारवाई

हिंदुस्थानातील कुस्तीपटू बजरंग पुनियाला नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) पुन्हा निलंबित केले आहे. यासंदर्भात त्याला नोटीसही बजावण्यात आली आहे. नॅशनल अँटी डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत बजरंगवर ही कारवाई करण्यात आली असून नोटिसीला उत्तर देण्यासाठी त्याला 11 जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

बजरंग पुनियावर ‘नाडा’ने याआधीही निलंबनाची कारवाई केली होती, मात्र त्यावेळी बजरंगला नोटीस बजावण्यात आली नव्हती. त्यामुळे तीन आठवडय़ांनंतर डोपिंगविरोधी शिस्तपालन समितीने हे निलंबन मागे घेतले होते, मात्र आता ‘नाडा’ने पुन्हा एकदा बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई करत नोटीसही बजावली आहे. त्यामुळे बजरंग पुनियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेण्यासाठी आशियाई पात्रता स्पर्धेच्या राष्ट्रीय चाचण्यांदरम्यान ‘नाडा’ने बजरंग पुनियाला मुत्राचे नमुने चाचणीसाठी मागितले होते, मात्र चाचणीसाठी मुदत संपलेले साहित्य दिल्याचा आरोप करीत बजरंगने मूत्राचे नमुने देण्यास नकार दिला होता. त्यानंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, मात्र त्यानंतर निलंबनाविरुद्ध अपील करण्यात आले होते. त्यानंतर शिस्तपालन समितीने जोपर्यंत ‘नाडा’ आरोपांची नोटीस जारी करत नाही तोपर्यंत निलंबन रद्द राहील, असे म्हटले होते.

दरम्यान, त्यानंतर आता ‘नाडा’ने पुन्हा बजरंग पुनियावर रविवारी कारवाई करत नोटीस पाठवली आहे. बजरंग पुनियाला पाठवण्यात आलेल्या नोटिसीमध्ये ‘नाडा’ने म्हटले की, ‘ही एक औपचारिक नोटीस आहे. यामध्ये तुमच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. आता तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.’ आता या घडामोडीला बजरंग पुनिया कसे सामोरे जातो याकडे तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.