टीम इंडियाच्या 19 वर्षांखालील महिला खेळाडूचे नशीब पाकिस्तानला चोपून काढल्यामुळे पालटले आहे. सलामीला येत कमलिनीने विस्फोटक खेळी करत टीम इंडियाला झटकीपट विजय मिळवून दिला. एकीकडे टीम इंडियाच्या विजयाचा आनंद आणि दुसरीकडे काहीच वेळाने कमालिनीची 10 लाख ते 1 कोटी अशी गगनभरारी, त्यामुळे सर्व स्तरातून कमलिनीचे कौतुक होत आहे. कमलिनीला आपल्या ताफ्यात सामावून घेण्यासाठी मुंबई आणि दिल्ली या संघांमध्ये चढाओढ पहायला मिळाली.
महिलांच्या 19 वर्षांखालील आशियाई चषकामध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान या संघांमध्ये लढत झाली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला फक्त 67 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अचूक मारा केल्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पाकिस्तानने दिलेल्या छोट्याशा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीला आलेली कमलिनी अक्षरश: पाकिस्तानच्या गोलंदाजांवर तुटून पडली. चौफेर फटकेबाजी करत 151 पेक्षाही अधिकच्या सरासरीने कमलिनीने 29 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 44 धावा चोपून काढल्या. तिच्या या विस्फोटक खेळीमुळे टीम इंडियाने 7.5 षटकांमध्ये आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत 9 विकेटने सामना आपल्या नावावर केला. याच दरम्यान WPL Auction ची सुरुवात झाली होती.
लिलाव प्रक्रियेत 10 लाख या मुळ किंमतीवर कमलिनीच्या नावाची घोषणा झाली. मुंबईच्या संघाने प्रथम कमलिनीला खरेदी करण्यासाठी बोली लावली. त्यानंतर दिल्लीनेही कमलिनीला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेण्यासाठी बोली लावली. दिल्ली आणि मुंबईच्या संघ मालकांमध्ये कमलिनीला खरेदी करण्यासाठी चांगलीच चढाओढ पहायला मिळाली. 10 लाख रुपायांना सुरू झालेली बोली 1.60 कोटी रुपयांवर येऊन स्टॉप झाली. दिल्लीने माघार घेतल्यामुळे मुंबईच्या संघाने 1.60 कोटी रुपयांना कमलिनीला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतले. त्यामुळे आगामी हंगामात कमलिनीची विस्फोटक खेळी पाहण्यासाठी चाहते आतुर असतील.