वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अन्नात कीडा आढळल्याने एकच खळबळ उडाली. तिरुनेलवेली-चेन्नई एग्मोर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला दिलेल्या सांबरमध्ये कीडा आढळून आला. यानंतर प्रवाशाने तात्काळ रेल्वेकडे तक्रार नोंदवली. दक्षिण रेल्वेने प्रवाशांची माफी मागितली. तसेच संबंधित परवानाधारकावर कारवाईचे आश्वासन दिले.
मदुराई स्थानकावर प्रवाशाला हे अन्न देण्यात आले होते. मात्र कॅसरोल कंटेनरचे झाकण उघडताच झाकणाला कीटक चिकटलेले आढळले. प्रवाशाच्या तक्रारीनंतर ऑनबोर्ड मॅनेजर, चीफ केटरिंग इन्स्पेक्टर (CIR), चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर (CCI) आणि असिस्टंट कमर्शियल मॅनेजर (ACM) यांनी वृंदावन फूड प्रोडक्ट्सने व्यवस्थापित केलेल्या तिरुनेलवेली बेस किचनद्वारे दिल्या जाणाऱ्या अन्नाची तपासणी केली.
दूषित अन्नाचे पॅकेट डिंडीगुल आरोग्य निरीक्षकांना देण्यात आले. यानंतर उरलेल्या अन्नाचीही तपासणी केली असता, उरलेल्या अन्नात काहीच समस्या नसल्याचे तपासात समोर आले. सदर प्रवाशाला डिंडीगुल स्थानाकावर दुसरे अन्नाचे पॅकेट देण्यात आले, मात्र त्याने ते नाकारले.
याप्रकरणी वृंदावन फूड प्रॉडक्ट्सला निष्काळजीपणा केल्याप्रकरणी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.