वरळीतील स्पामध्ये एकाची चाकूने भोसकून हत्या; हत्येचे कारण गुलदस्त्यात

वरळी नाका येथे असलेल्या सॉफ्ट टच नावाच्या स्पामध्ये मंगळवारी रात्री हत्येची घटना घडली. 52 वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरू वाघमारे (५२) असे मृतकाचे नाव आहे. विलेपार्ले येथे राहणारा वाघमारे वरळीच्या सॉफ्ट टच स्पामध्ये मंगळवारी संध्याकाळी गेला होता. १७ तारखेला त्याचा वाढदिवस झाला तेव्हा त्याने मित्रांना पार्टी दिली होती. त्यामुळे आम्हालाही पार्टी दे असे स्पामधील त्याचे मित्र म्हणाले. त्यानुसार वाघमारे, त्याची २१ वर्षीय मैत्रीण आणि अन्य तीन मित्र असे पाच जण रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शीव येथे गेले. तेथे पार्टी केल्यानंतर सर्व जण पुन्हा रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास वरळीतील स्पामध्ये आले. काही वेळ गप्पाटप्पा केल्यानंतर तिघे तेथून निघून गेले. त्यामुळे वाघमारे आणि त्याची मैत्रीण असे दोघेच स्पामध्ये राहिले. त्यानंतर थोड्या वेळाने दोघे स्पामध्ये गेले. मग तेही काही वेळात तेथून निघून गेले. दरम्यान सकाळी स्पाचे शटर उघडल्यानंतर वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.