वरळी हिट ऍण्ड रन: मिहीर शहाला व्हीआयपी ट्रीटमेंट!

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मिंधे गटाचा उपनेता राजेश शहाचा मुलगा मिहीर शहाला मंगळवारी पोलिसांनी ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली. सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवलेल्या मिहीरला पोलीस व्हॅनऐवजी खासगी कारमधून कोर्टात आणले. कोर्टातही नातेवाईकांच्या भेटीसाठी स्वतंत्र खोलीत बसवले. निष्पाप महिलेला कारखाली चिरडणाऱया आरोपीवर पोलिसांची एवढी मेहरबानी का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वरळी कोळीवाडय़ातील कावेरी नाखवा यांचा निर्दयीपणे बळी घेणाऱया मिहीर शहाला अटक केल्यानंतर दंडाधिकाऱयांनी त्याला सहा दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. त्या कोठडीची मुदत मंगळवारी संपली. त्यामुळे मिहीरला पुन्हा शिवडी न्यायालयात हजर केले होते. मिहीर हा अत्यंत गंभीर गुह्यातील आरोपी असूनही पोलिसांनी त्याला खासगी कारमधून न्यायालयात आणले. वरळीची घटना घडल्यानंतर सरकारवर जोरदार टीका झाली होती. मिंधे गटाचा उपनेता राजेश शहा हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा असल्यामुळे आरोपी मिहीर शहाला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका झाली होती. त्यावर आरोपीची गय केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात मंगळवारी पोलिसांनी मिहीरला खासगी एर्टिगा कारमधून न्यायालयात आणले. ही ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ कुणाच्या सांगण्यावरून दिली गेली? पोलीस एवढे मेहरबान का झाले? कोर्टाच्या परवानगीशिवाय नातेवाईक व परिचयाच्या लोकांची भेट घेण्यासाठी मिहीरला स्वतंत्र बंद खोलीत का बसवले, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

जामिनासाठी अर्ज करू शकणार
कावेरी नाखवा यांना दीड किलोमीटर फरफटत नेऊन निर्घृण हत्या करणाऱया मिहीरला शिवडी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे तो आता जामिनासाठी अर्ज करू शकणार आहे. घटनेनंतर त्याला फरार होण्यास कोणी मदत केली हे तपासात अजून उघड झालेले नाही, असे सांगून सरकारी वकील रवींद्र पाटील व भारती भोसले यांनी मिहीरच्या पोलीस कोठडीत वाढ मागितली. त्यावर मिहीरच्या वकिलांनी आक्षेप घेतला. दोन्ही युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने मिहीरची 30 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

अद्याप ड्रंक ड्रायव्हिंगचा गुन्हा का नोंदवला नाही?
कावेरी यांचा हकनाक बळी घेणाऱया मिहीरच्या बीएमडब्ल्यू कारच्या काचेला काळी फिल्म लावली होती. तसेच कारचे पीयूसी व विमा संपला असतानाही तो कार चालवत होता. त्यामुळे पोलिसांनी मोटर वाहन कायद्यातील काही कलमे जोडली आहेत. मिहीरने कारमध्ये बीअर डोसून नंतर सी लिंकच्या लॅण्डिंग पॉईंट परिसरात रिकामे टिन फेकले होते. ते टिन हस्तगत करूनही पोलिसांनी अद्याप ड्रंक अँड ड्रायव्हिंगचा गुन्हा नोंदवलेला नाही. तसेच कारच्या पुढच्या बाजूची नंबर प्लेट अद्याप सापडलेली नाही. घटनेनंतर फरार झालेल्या मिहीरने नालासोपाऱयातील पेल्हार रोड येथील सलूनमध्ये केस कापले आणि दाढी केल्याचे उघड झाले आहे.