आपण काय गुन्हा केलाय हे आरोपीला माहिती असल्यास त्याला अटकेची कारणे लेखी स्वरूपात देण्याची गरज नाही, असे खडसावत हायकोर्टाने वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणात मिहीर शाहची याचिका फेटाळून लावली.
अटकेची कारणे पोलिसांनी लेखी स्वरूपात आरोपीला देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. अशा प्रकरणात आरोपी कायद्यातील तरतुदींचा गैरफायदा घेऊ शकत नाही. तसे आम्ही होऊ देणार नाही, असे न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. अटक करतेवेळी आम्हाला अटकेची कारणे लेखी स्वरूपात पोलिसांनी दिली नाहीत. त्यामुळे अटकच बेकायदा ठरते. आमची तत्काळ सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मिहीर शाह व त्याचा चालक राजऋषीने केली होती. मात्र ही याचिका खंडपीठाने फेटाळून लावली.
पीडिताचे अधिकार अबाधित ठेवायला हवेत
राज्य घटनेने आरोपीच्या अधिकारांचे जसे संरक्षण केले आहे, तसेच पीडितालाही काही अधिकार दिले आहेत. जलद न्याय, संरक्षणाची हमी अशा अनेक गोष्टी पीडिताच्या अधिकारात नमूद आहेत. आरोपीने कायद्याचा अधिकार घेत एखादी मागणी केल्यास पीडिताच्या अधिकाराला बाधा होणार नाही याची काळजी न्यायालयाने घ्यायला हवी, असेही खंडपीठाने नमूद केले.
गुन्हा ही पीडिताची समस्या नाही
गुन्हा ही पीडिताची समस्या नाही. न्याय प्रक्रियेत पीडित दुर्लक्षित असतो. व्यवस्था पीडिताला केवळ दया दाखवते. त्यापलीकडे काही करत नाही, असे गंभीर निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.