वरळी हिट ऍण्ड रन – मिहीर शहा विरोधात अतिरिक्त आरोपपत्र सादर करा

वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा अडचणीत येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी एफआयआरमध्ये आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता 103 अंतर्गत नोंद करावी व अतिरिक्त आरोपपत्र दाखल करावे अशी मागणी करत कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप यांनी अॅड. दिलीप साटले यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

मिहीर हा मिंधे गटाचा उपनेता राजेश शहाचा मुलगा आहे. त्याने 7 जुलैला दारूच्या नशेत बीएमडब्ल्यू कार बेदरकारपणे चालवली आणि वरळी परिसरात कावेरी नाखवा यांना कारखाली चिरडले. नंतर वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत फरफटत नेले. याप्रकरणी पोलिसांनी मिहीर शहाला अटक करत त्याच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. इतकेच नव्हे तर चार्जशीटदेखील दाखल केली. भारतीय न्याय संहितेच्या 103 कलमांतर्गत आरोपपत्रात नोंद करण्यात न आल्याने प्रदीप नाखवा यांनी पोलिसांना याबाबत पत्र लिहिले तसेच अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्याची विनंती केली. मात्र राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नाखवा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.