मिहिर शहाला आश्रय देणारा माशाल्ला रिसॉर्ट बनला बेकायदा धंद्यांचा अड्डा

ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रिसॉर्टच्या बांधकामाची कोणतीही परवानगी घेतली नसून ग्रामपंचायतीच्या नोटीसला त्याने केराच्या टोपलीत टाकले आहे. सर्व्हे क्रमांक 370/4 मध्ये उत्खनन व रस्ते बांधकाम करताना 16 लाख गौण खनिज कर भरला नसून शहापूर तहसीलदार यांचे आदेश झुगारले आहेत.

रिसॉर्टमध्ये रात्रभर रेव्ह पार्टीमध्ये अमली पदार्थ, हुक्का, मद्य सेवन करून डिजेच्या कर्कश आवाजात धिंगाणा चालू असतो. हे रिसॉर्ट मुंबई, ठाण्यात गुन्हा करून लपण्याचा अड्डा बनला असून गुन्हेगारी क्षेत्रातील अनेक गुंड व टोळ्यांचा येथे वावर असतो. आताही याच रिसॉर्टवर लपलेल्या वरळी ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणातील आरोपी मिहिर शहाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मिहिर व त्याच्या कुटुंबीयांना या रिसॉर्टवर रवाना करण्यामागे शहापुरातील एका पंजाबी कुटुंबाचा हात असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

गोपनीय खोल्यांचे गूढ

रिसॉर्टमध्ये निवासी खोल्या, स्वयंपाक घर, भोजन कक्ष, निवासी तंबू, तरण तलाव, वॉशरूम तसेच काही गोपनीय खोल्या आहेत. यामध्ये काळ्या जादूसारखे प्रकार घडत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. रिसॉर्टची संरक्षक भिंत दहा फूट आहे. तिथे स्थानिक रहिवासी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शासकीय कर्मचारी यांना प्रवेश दिला जात नाही. येथील सर्व कामगार परप्रांतीय आहेत. काही दिवसांपूर्वी रिसॉर्टमालकाने एका शेतकऱ्यावर रिव्हॉल्व्हर रोखल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

माशाल्ला रिसॉर्ट भातसा, खराडे धरण, घाटघर जलविद्युत प्रकल्पाजवळ आहे. या रिसॉर्टवर देशद्रोही आणि गुन्हेगारी प्रवृतीच्या लोकांची ये-जा असते अशी चर्चा आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांपासून या प्रकल्पाला धोका आहे.

अनधिकृत असलेल्या माशाल्ला रिसॉर्टवर बेकायदेशीर धंदे चालू असून स्थानिक शेतकरी व आदिवासींना त्यांचा खूप त्रास आहे. प्रशासन व ग्रामपंचायतीला न जुमानणाऱ्या रिसॉर्टमालकावर गुन्हा दाखल करून रिसॉर्टचे बेकायदेशीर बांधकाम तोडण्यात यावे.

– अॅड. हरेश साबळे, स्थानिक रहिवासी.