वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी पक्षपातीपणा व निष्काळजीपणा केला असल्याचा दावा करत कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता 103 अंतर्गत नोंद करावी व अतिरिक्त आरोपपत्र दाखल करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली असून हायकोर्टाने याची दखल घेत पोलिसांना नोटीस बजावली तसेच भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
मिहीर हा मिंधे गटाचा उपनेता राजेश शहाचा मुलगा आहे. त्याने 7 जुलैला दारूच्या नशेत बीएमडब्ल्यू कार बेदरकारपणे चालवली आणि वरळी परिसरात कावेरी नाखवा यांना कारखाली चिरडले. नंतर वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत फरफटत नेले. या प्रकरणी पोलिसांनी मिहीर शहाला अटक करत त्याच्या विरोधात विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. इतकेच नव्हे तर चार्जशीटदेखील दाखल केली. भारतीय न्याय संहितेच्या 103 कलमाच्या अंतर्गत आरोपपत्रात नोंद करण्यात न आल्याने प्रदीप नाखवा यांनी पोलिसांना याबाबत पत्र लिहिले तसेच अतिरिक्त आरोपपत्र दाखल करण्याची विनंती केली. मात्र राज्य सरकारकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नाखवा यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.