वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याला वाचवण्याचा प्रयत्न मिंधे सरकार करत आहेत. दुर्घटनेच्या वेळी मिहीर ड्रग्जच्या नशेत होता. ती नशा रेकॉर्डवर येऊ नये, त्याचे ब्लड रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ नयेत म्हणूनच त्याला तीन दिवस फरार ठेवण्यात आले, असा खळबळजनक आरोप शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला. यामुळे संशयाची सुई मुंबई पोलिसांवरही येते, असेही संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वरळीतील हिट अॅण्ड रन प्रकरणावरून सरकारवर घणाघात केला. हे साधेसुधे प्रकरण नाही. पुण्यातील पोर्शे कार प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाप्रमाणेच हीसुद्धा ‘नेता फॅमिली’ आहे, असे संजय राऊत म्हणाले. मिहीरला पहिल्या दिवसापासून वाचवण्याचा प्रयत्न होत होता. कारण त्याचे वडील राजेश शहा मिंधे गटाचे उपनेते आहेत. त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. काय करतात? एवढय़ा महागडय़ा गाडय़ा कशा येतात? कुठून आली इतकी प्रॉपर्टी? याचा हिशेब मुंबई पोलिसांना आता करावा लागेल. ते मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय कसे झाले? असा सवाल संजय राऊत यांनी केला. बोरिवली पोलीस स्टेशनला जाऊन सगळे रेकॉर्ड चेक केल्यावर राजेश शहा कोण आहेत हे समजेल असे सांगत, राजेश शहाचा रेकॉर्ड सर्वांसमोर आणा, असे आवाहन संजय राऊत यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना केले.
लोकांनी रस्त्यावर उतरून पोलीस, मुख्यमंत्र्यांना जाब विचारावा
मिहीरने नशेत एका निरपराध महिलेला चिरडले. एकदा नाही तर अनेक वेळा चिरडले. रस्त्यावर फेकून देऊन पुन्हा चिरडले. हा खूपच अमानुष प्रकार आहे, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला. अशी निर्दयी व्यक्ती कायद्याच्या कचाटय़ातून सुटली नाही पाहिजे आणि जर सुटलीच तर रस्त्यावर उतरून लोकांनी जाब विचारला पाहिजे, मुंबई पोलिसांना आणि मंत्रालयात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.