Mumbai Hit And Run Case : आरोपी मिहीर शहाला पोलिसांकडून VIP ट्रीटमेंट! खासगी कार, नातेवाईकांचीही घडवली भेट

मुंबईमधील वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शहा हा घटनेनंतर 60 तास फरार होता. पोलिसांना तो का सापडला नाही? यावरून पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात होता. आता आरोपी मिहीर शहा याला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पोलीस नक्की कोणासाठी काम करतात? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सुरक्षेच्या कारणावरून आरोपी मिहीर शहा याला कोर्टात आणण्यासाठी पोलिसांकडून खासगी कारचा वापर करण्यात आला. आरोपी मिहीर शहाला जेलमधून कोर्टात हजर करण्यासाठी ब्लॅक फिल्म लावलेल्या खासगी कारचा वापर पोलिसांकडून करण्यात आला. एवढचं नव्हे तर पोलिसांनी सुरक्षेचं कारण पुढे करत मिहीर शहा याची कोर्टात नातेवाईकांसोबत भेट घडवून दिली. कोर्टाच्या परवानगीशिवाय एका बंद खोलीत मिहीर शहा याला त्याच्या नेताईकांना भेटू दिले. यामुळे पोलीस मिहीर शहावर इतके मेहरबान का? असा सवाल करण्यात येत आहे.

मिहीर शहाला कोर्टात एका खासगी कारमधून आणण्यात आले. या कारच्या काचेवर ब्लॅक फिल्म लावलेली होती. नियमानुसार खासगी वाहनांवर किंवा कारवर ब्लॅक फिल्म लावण्यास बंदी आहे. पण पोलिसांनीच हा नियम मोडल्याचे समोर आले आहे. यावर पोलिसांनी सारवासारव करत आरोपीच्या सुरक्षेसाठी अशा कारचा वापर केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.