Worli Hit And Run Case: जयवंत वाडकर संतापले, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी

काहीच दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना सोमवारी वरळीमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे मुंबई हादरून गेली आहे. या अपघातात मिंधे गटाचा पालघर जिल्हाप्रमुख आणि उपनेता राजेश शहा याच्या मुलाने एका महिलेला बीएमडब्ल्यू कारने चिरडले. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. आता या प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

या अपघातात कावेरी नाखवा यांचे पती प्रदीप नाखवा बचावले, पण कावेरी यांचा मृत्यू झाला. मृत कावेरी नाखवा या ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची पुतणी होती. त्यांनी याबाबत नुकत्याच एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये या प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. वाडकर यांनी यावेळी आरोपींवर दया न दाखवता त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशीही मागणी केली आहे. पुढे त्यांनी पुतणी कावेरी हिच्याविषयी काही भावूक आठवणी शेअर केल्या आहेत.

जयवंत वाडकर पुढे म्हणाले की, हिट अॅण्ड रन प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कायदा केला पाहिजे आणि त्यांना फाशी द्यायला पाहिजे. ज्या विकृतीने गाडी चालवून एखाद्याचा जीव घेणं म्हणजे काय असतं हे त्यांनाही कळायला हवे.अशा आरोपींना तशीच शिक्षा दिली पाहिजे असा संताप व्यक्त करत ते म्हणाले, गाडी समोर साधा उंदीर आला तरी आपण गाडी थांबवतो किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. तिथे गाडी सोडून नंतर पळून जाणं म्हणजे तर खूप खूप वेदनादायक गोष्ट झालेली आहे. पुढे ते म्हणाले की,  शासनाने या प्रकरणातील एकालाही सोडता कामा नये. मला आपल्या पोलिसांवर विश्वास आहे आणि पोलीस योग्य ती कारवाई करतीलच असेही ते यावेळी म्हणाले.