लसीकरणाने मिनिटाला वाचले सहा जणांचे प्राण; जगभरात साजरा होतोय लसीकरण सप्ताह

जागतिक लसीकरण सप्ताह 24 ते 30 एप्रिलदरम्यान साजरा होतोय. यानिमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने ‘सर्वांसाठी लसीकरण मानवीदृष्टय़ा शक्य आहे,’ या संकल्पनेवर मोहीम सुरू केली आहे. लसीकरणाचे महत्त्व सर्वांना समजावे हा उद्देश ठेवून ही जनजागृतीपर मोहीम राबवण्यात येतेय.

डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, लसीकरण हे मानवाचे सर्वात मोठे यश आहे. मागील 50 वर्षांत अत्यावश्यक लसींनी 15 कोटी 40 लाख लोकांचे आयुष्य वाचवले आहे. म्हणजेच लसीकरणामुळे प्रत्येक मिनिटाला सहा जणांचे प्राण वाचलेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, लसीकरणावर केलेली गुंतवणूक ही हेल्थकेअर यंत्रणेवरील दीर्घकालीन बोझा कमी करते. परिणामी देशाच्या अर्थव्यवस्थेवरील भार कमी होतो. लसीकरणाच्या कामी लावलेला एक डॉलर आर्थिकदृष्टय़ा 44 अमेरिकन डॉलरचा फायदा करून देतो.

दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात जागतिक लसीकरण सप्ताह साजरा होतो. लसीकरणाचा प्रसार आणि रोगांना आळा घालणे हे जागतिक लसीकरण सप्ताह साजरा करण्याचे उद्दिष्ट आहे.