लोकसंख्या वाढीत हिंदुस्थान सर्वात पुढे

11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन आहे. यानिमित्ताने लोकसंख्यावाढीमुळे निर्माण होणाऱया समस्यांकडे लक्ष वेधले जाते आणि त्यावर विचारमंथन केले जाते. जगाच्या लोकसंख्येत अलीकडच्या शतकात मोठी वाढ झाली आहे. सर्वात जास्त वाढ आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये झालेय. सध्या ज्या गतीने लोकसंख्या वाढत आहे, ती त्याच पद्धतीने वाढत राहिली तर 2050 सालापर्यंत जगाची लोकसंख्या 9.7 अब्ज तर 2080 च्या दशकाच्या मध्यापर्यंत 10.4 अब्जावर गेलेली असेल, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिलेली आहे.  थोडक्यात पुढील तीस वर्षांमध्ये जगाच्या लोकसंख्येमध्ये दोन अब्ज लोकांची भर पडणार आहे.

यूएनएफपीएच्या जागतिक लोकसंख्या अहवालानुसार, काही वर्षांपूर्वी जगामध्ये चीनची लोकसंख्या सर्वाधिक होती. मात्र, 2023 मध्ये चीनला मागे टाकत 1.42 अब्ज लोकसंख्येसह हिंदुस्थान पहिल्या क्रमांकावर आला.

75 वर्षांमध्ये हिंदुस्थानची लोकसंख्या दुप्पट

यूएनएफपीएच्या अहवालानुसार, येत्या 75 वर्षांत हिंदुस्थानची लोकसंख्या दुप्पट होण्याचा अंदाज आहे. देशाच्या लोकसंख्येत 2050 नंतर घसरण होण्याची शक्यता आहे. जागतिक लोकसंख्येच्या बाबतीतही घट होईल. जागतिक लोकसंख्या सध्या 8 अब्जाहून थोडी जास्त आहे.

2023 मध्ये हिंदुस्थानची लोकसंख्या 142 कोटी 86 लाख 27 हजार 663 इतकी होती. आता 2024 मध्ये हिंदुस्थानच्या लोकसंख्येचा अक्षरशः विस्फोट झाला आहे. देशाची लोकसंख्या आता या एका वर्षात 144 कोटी 17 लाख 19 हजार 852 इतकी झाली आहे. हिंदुस्थान, चीनच्या खालोखाल अमेरिका अंदाजे 34 कोटी, इंडोनेशिया 27 कोटी, पाकिस्तान 24 कोटी, नायजेरिया 22 कोटी, ब्राझील 21 कोटी, बांगलादेश 17 कोटी, रशिया 14 कोटी, इथिओपिया 12 कोटी आहे.