दावोसमध्ये घुमला मराठी आवाज! मुख्यमंत्र्यांचे मराठमोळे स्वागत; आता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेकडे लक्ष

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेसाठी गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वित्झर्लंडमधील मराठी बांधवांकडून झालेल्या मराठमोळय़ा स्वागताने भारावून गेले. स्वित्झर्लंड बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या वतीने फडणवीस यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी महिलांनी पारंपरिक लेझीम खेळून फडणवीस यांचे स्वागत केले. मराठी बंधू-भगिनींच्या या प्रेमाला मोल नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला या प्रेमातच राहायचे आहे, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वित्झर्लंडच्या झ्युरिक येथे बृहन् महाराष्ट्र मंडळात तेथील मराठी बांधव आणि भगिनींशी मनमोकळा संवाद साधला. आपली जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटून स्वित्झर्लंडवासीय मराठी बंधू-भगिनींनीही आनंद व्यक्त केला आणि महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक घेऊन जा अशा शुभेच्छाही दिल्या. आपला महाराष्ट्र हिंदुस्थानचे पॉवर हाऊस असून देश पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षांतच महाराष्ट्र पहिली उपराष्ट्रीय ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र देशाचे डेटा सेंटर पॅपिटल असल्याचे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार असल्याचे यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला देव, देश, धर्माकरिता लढायला शिकवले, आपल्या संस्कृतीचा, भाषेचा अभिमान बाळगायला शिकवले, ती शिकवण मराठी माणसाने स्वित्झर्लंडमध्येही जपली आणि पुढच्या पिढीलाही दिली, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून मराठीला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी स्वित्झर्लंडसह वैश्विक मराठी परिवारातील मराठी बंधू-भगिनी आमचे राजदूत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याप्रसंगी स्वित्झर्लंड बृहन् महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अमोल सावरकर, सेव्रेटरी किर्तीताई गद्रे, महेश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांचे झ्युरिक येथे हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्वित्झर्लंड संस्थेच्या वतीनेही सहर्ष स्वागत करण्यात आले.