गुकेशने बरोबरी साधली, तिसऱ्या डावात डिंगवर केली मात

हिंदुस्थानचा युवा ग्रॅण्डमास्टर डी गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील तिसऱ्या डावात गुरुवारी विद्यमान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनवर विजय मिळविला. तीन डावांनंतर उभय बुद्धिबळपटूंमध्ये 1.5-1.5 अशी बरोबरी झाल्याने स्पर्धेतील रंगत वाढणार आहे.

हिंदुस्थानचा 18 वर्षीय युवा आव्हानवीर डी. गुकेशने तिसऱ्या डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना सफाईदार विजय मिळविला. काळय़ा मोहऱ्यांनी खेळणाऱ्या डिंगला वेळेचे गणित साधण्यात अपयश आल्याने त्याने अखेर हार मान्य केली. पहिल्या डावातही पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळण्याची संधी मिळूनही गुकेशला अपयश आले होते. या चुकीतून धडा घेत त्याने दुसऱ्यांदा विजय हातातून निसटणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. जगज्जेतेपदाच्या लढतीत पहिल्या 40 चालींसाठी 120 मिनिटांचा वेळ दिला जातो. मात्र गुकेशने केवळ चार मिनिटांतच 13 चाली रचल्या, तर डिंगला या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी 1 तास 6 मिनिटांचा वेळ लागला. त्यानंतर वेळेचे गणित साधणे डिंगला अवघड होत गेले. डिंगकडे अखेरच्या 13 चालींसाठी 12 मिनिटे राहिली अन् येथेच त्याची कोंडी झाली. अखेरच्या सहा चालींसाठी केवळ 10 सेकंदांचा वेळ उरल्याने डिंगने 37 व्या चालीनंतर पराभव मान्य केला.

‘‘पहिल्या डावात विजयाने हुलकावणी दिल्यानंतरही मी समाधानी होती. आज माझा खेळ अधिकच चांगला झाला. मी जशी तयारी केली होती त्यानुसारच 13 व्या चालीपर्यंतचा खेळ झाला. मी योग्य चाली रचल्या आणि डिंगपेक्षा सरस खेळ केला. त्यामुळे मला विजयाला गवसणी घालणे शक्य झाले.’’

n डी. गुकेश