सांगली शहरातील महापुराबाबत 20 वर्षांत मनपा प्रशासनाकडून उपाययोजनाच नाहीत, जागतिक बँकेच्या पथकाची महापालिकेवर नाराजी

शहराला महापुराचा वेढा बसत असताना प्रशासनाने गेल्या वीस वर्षांत कोणत्याच उपाययोजना केल्या नाहीत, त्याबद्दल जागतिक बँकेच्या पथकाने महापालिकेवर नाराजी व्यक्त केली. तसेच श्यामरावनगरमध्ये सतत पाणी साचून राहत असल्याने दरवर्षी या भागातील इमारती दोन मिलिमीटरने खचतील, अशी भीती व्यक्त केली. दरम्यान, महापालिकेच्या 476 कोटींचा आराखडा ऑगस्टपर्यंत मंजुरी प्रक्रियेतील पुढील टप्प्याला जाईल, असा विश्वास जागतिक बँकेच्या पथकाने महापालिका प्रशासनाला दिला.

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी सांगली शहरातील पूरबाधित भागाची पाहणी करून महापालिकेत बैठक घेतली. या बैठकीत आयुक्त शुभम गुप्ता यांनी अधिकाऱयांचे स्वागत केले. यावेळी गुरव ऍण्ड कन्सल्टंट यांनी स्ट्रॉम वॉटर मॅनेजमेंटचे सादरीकरण केले. जागतिक बँकेचे आपत्ती जोखीम व्यवस्थापन विशेषज्ञ अनुप कारंथ, वरिष्ठ वित्तीय व्यवस्थापन विशेषतज्ञ सविनय ग्रोव्हर, वरिष्ठ सामाजिक विकास विशेषज्ञ वरुण सिंग, वरिष्ठ पर्यावरण विशेषतज्ञ नेहा व्यास यांच्यासमवेत महापालिकेत बैठक झाली.

महापालिका क्षेत्रातील पूरबाधित क्षेत्र, हरीपूरच्या पूर्वेकडील काळीवाट ते विश्रामबाग ते वॉनलेसवाडी, कुंभारमळापर्यंतच्या परिसरात कायम साचून राहणारे पाणी, याशिवाय महापालिका क्षेत्रातील विविध 78 ठिकाणी रस्ते, सखल भागात साचून राहणारे पावसाचे पाणी याचा निचरा होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. महापालिका क्षेत्रातील 11 नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, पक्के बांधकाम तसेच सर्व छोटय़ा नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, त्यावरील अतिक्रमण काढणे, छोटे पूल बांधणे, भोबे टाईप मोठय़ा गटारी बांधणे, या गटारीत न येणाऱया पाण्याचा उपसा करण्यासाठी श्यामरावनगरमध्ये दोन ठिकाणी पंपिंग स्टेशन व अन्य कामांचा समावेश आहे. या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. जागतिक बँकेच्या पथकाने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या सज्जतेबद्दल समाधान व्यक्त करत सूचनाही केल्या. ऑगस्टपर्यंत आराखडा मंजुरीच्या प्रक्रियेतील पुढील टप्प्यात जाईल, असा विश्वास जागतिक बँक पथकाने महापालिका प्रशासनाला दिला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, चंद्रकांत खोसे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे, आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सहायक आयुक्त नकुल जकाते, विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद, अभियंता महेश मदने उपस्थित होते.

श्यामरावनगरमध्ये उंच इमारतींना परवानगी कशी दिली?

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी सांगली शहरातील श्यामरावनगर, के. टी. बंधारा, मारुती चौक, आयर्विन पूल, स्टेशन चौक, झुलेलाल चौक, कुंभारमळा यांसह पुराचे पाणी साचणाऱया ठिकाणांची पाहणी केली. सिद्धिविनायक कॉलनीत 2019 रोजी महापुराचे आलेले पाणी पाच वर्षे झाले तरी साचून राहिले असल्याकडे लक्ष वेधले. कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सर्जेराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी उपस्थित होते. श्यामरावनगरसारखी विकसित होत असलेली उपनगरे पाहाता येथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला नाही का? काळी जमीन आणि पाण्याचा निचरा होत नाही, अशा भागात नागरी वस्तीला किंवा आता होत असलेल्या उंच उंच अपार्टमेंट्सला बांधकाम परवाने कसे काय दिले? त्यांची बिल्डिंग लाईफ किती राहील, असे प्रश्न पथकाने उपस्थित केले. इथली जमीन, साचून राहणारे पाणी पाहाता, इथेही इमारती दरवर्षी दोन मिलिमीटरने खचतील, अशी भीतीही पथकातील तज्ञांनी व्यक्त केली.

476 कोटींच्या आराखडय़ाचे सादरीकरण

n महापालिका क्षेत्रात महापूर तसेच साचून राहणाऱया पावसाच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी महापालिकेने बुधवारी जागतिक बँकेच्या पथकापुढे 476 कोटी रुपयांच्या आराखडय़ाचे सादरीकरण केले. श्यामरावनगरसह 78 ठिकाणी करावयाच्या विविध उपाययोजनांचा आराखडय़ात समावेश आहे. दरम्यान, आराखडय़ात पर्यावरणीय व सामाजिक बाबींच्या उपाययोजनांचाही समावेश करण्याच्या सूचना जागतिक बँकेच्या पथकाने केली.