महापालिकेने दोन वर्षांपूर्वी नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. 38 पुलांचे यामध्ये बेअरिंग बदलणे, एक्सस्पायसन्स जॉईंट दुरुस्त करणे व आदी डागडुजी करणे आवश्यक होते. मात्र, निधीअभावी 27 पुलांची कामे रखडली आहेत. महापालिकेने आता नद्यांवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिटनंतर शहरातील ओढे, नाले आणि कालव्यांवर बांधलेल्या सर्व पुलांचे व कल्व्हर्टचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, स्ट्रक्चरल ऑडिट हे सहा महिन्यांसाठी असते. सहा महिन्यांत कामे न केल्यास पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार आहे.
हडपसर येथील उड्डाणपुलाच्या पिलरला तडा गेल्याने व बेअरिंग खराब झाल्याने उड्डाणपुलाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर शहरातील दहा वर्षांहून अधिक जुन्या उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने हे पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहेत का, याचा अभ्यास सबडक्शन झोन कन्सलटन्सी सर्व्हिसेस या कंपनीकडून केले गेले. महापालिकेने दोन वर्षांपूर्वी नदीवरील 38 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. पुलांची कामे करण्यासाठी महापालिकेने 35 कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, प्रकल्प विभागाकडे या कामासाठी 15 कोटींचा निधी उपलब्ध होता. त्यामुळे 11 पुलांची कामे करण्यात आली. उर्वरित २७ पुलांच्या कामासाठी तरतूद केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ही कामे केली जाणार आहेत.
दरम्यान, शहरात आंबील ओढा, भैरोबा नाल्यासह अनेक लहान-मोठे नाले-ओढे आहेत. याबरोबरच मुठा डावा कालवादेखील शहरातून ग्रामीण भागामध्ये जातो. संबंधित नाले, ओढे, कालव्यावर महापालिका प्रशासनाने लहान-मोठे पूल, कल्व्हर्ट बांधले आहेत. त्यातील काही पूल व कल्व्हर्ट जुने झाले आहेत. त्यामुळे नदीवरील पुलांच्या धर्तीवर हे पूल व कल्व्हर्ट धोकादायक झाले आहेत का, त्यांची सद्यस्थिती नेमकी कशी आहे, याबाबतची पाहणी महापालिकेकडून केली जाणार आहे. या पुलांचे महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्यानंतर पुलांच्या कामांसंदर्भात पुढील कार्यवाही केली जाणार आहे. ओढे-नाले व कालव्यांवरील पूल सध्या सुरू आहेत. मात्र, या पुलांची नेमकी काय स्थिती आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे. त्यातून पुलांची डागडुजी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारे धोके टाळणे शक्य होईल. त्यादृष्टीने या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे काम केले जाणार असल्याचे प्रकल्प विभागाचे प्रमुख युवराज देशमुख यांनी सांगितले.