900 कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची तक्रार नाही!

एखाद्या कंपनीबद्दल तिथल्या कर्मचाऱ्यांची एकही तक्रार नसणे, असं होणं जरा कठीणच असते. कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षिततेसंदर्भात कर्मचाऱ्यांच्या काही ना काही तक्रारी असतात. मात्र अशा 900 हून अधिक कंपन्या आहेत, जिथे कर्मचाऱ्यांनी कंपनीबद्दल एकही तक्रार केलेली दिसून येत नाही.

बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनिबिलिटी रिपार्टिंगच्या डेटानुसार ही माहिती समोर आलेय. आरोग्य आणि सुरक्षिततेसंदर्भात 2.20 लाखपेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत. सुमारे 75 हजार तक्रारी या कामाच्या ताणाबद्दल होत्या.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे प्रा. बिनो पॉल यांच्या मते, कर्मचाऱ्यांनी तक्रार न करणे हा चिंतेचा विषय आहे. एकही तक्रार नसणे, हे अशक्य आहे. अपराजिता कॉर्पोरेट सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक नागराज कृष्णन यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची नीट नोंद होत नाही. त्यामुळे त्यांचा रेकॉर्ड उपलब्ध होत नाही तर काही कंपन्यांनी कोविड काळानंतर कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहेत.