दिवाळीला ऑनलाईन सफाई कामगार बोलावणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. सफाईसाठी आलेल्या दोघा कामगारांनी महिलेच्या घरातील लाखोंचे सोने लुटून पलायन केले. मुंबईतील दहिसर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
दहिसरमधील ऋषिकेश सोसायटीत राहणाऱ्या दिपाली म्हात्रे या महिलेने NoBroker अॅपच्या माध्यमातून 21 ऑक्टोबर रोजी क्लिनिंग सर्विस बुक केली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता दोन तरुण त्यांच्या घरी आले. दोघांनी घरची साफसफाई केली आणि निघून गेले.
काही वेळाने म्हात्रे यांनी आपल्या घरातील तिजोरी उघडी असल्याचे पाहिले. त्यांनी तिजोरीत पाहिले असता चार लाख रुपयांचे सोने गायब होते. त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत फिर्याद नोंदवली. यानंतर पोलिसांनी सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज तापसले.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दोघा आरोपींची ओळख पटवली. संतोष ओमप्रकाश यादव आणि सुफियान नजीर अहमद सौदार अशी दोघा आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सुरूवातीच्या तपासाच्या आधारे मुख्य संशयित आरोपी आरबाज खान नामक तरुणाला अटक केली. NoBroker अॅने आपल्या कर्मचाऱ्यांच्या बॅकग्राऊंडबाबत व्हेरिफिकेशन केले होते का याबाबतही पोलीस तपास करत आहेत.