उंदरांमुळे मुंबई-दिल्ली महामार्ग खचला, कर्मचाऱ्याचा अजब दावा; कंपनीने केली हकालपट्टी

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेला मुंबई-दिल्ली महामार्ग वर्षभराच्या आतच खचला. मात्र रस्ता खचण्याचे अजब कारण महामार्ग बांधणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले. यानंतर महामार्ग खचला यापेक्षा कर्मचाऱ्याने दिलेल्या कारणामुळे सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. उंदरांमुळे महामार्ग खचल्याचा दावा या कर्मचाऱ्याने केला होता. यानंतर सदर कंपनीने या कर्मचाऱ्याची हकालपट्टी केली आहे.

उंदीर किंवा छोट्या प्राण्याने हा खड्डा केला असावा. ज्यामुळे पाणी झिरपून मोठा खड्डा पडला असावा, असा अजब दावा कर्मचाऱ्याने केला होता. यानंतर सदर कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. कर्मचाऱ्याला महामार्ग बांधणीचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नव्हते. हा कर्मचारी मेन्टेनन्स व्यवस्थापक नव्हता. त्याने केलेला दावा चुकीचा होता. त्यामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्यात येत आहे, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

मुंबई-दिल्ली महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2023 रोजी अनावरण केले होते. हा महामार्ग 1,386 किलोमीटरचा असून तो भारतातील सर्वात मोठा महामार्ग आहे.