डोक्यावर जड मशिन पडल्याने 18 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना झवेरी बाजारातील एका सोन्याच्या कारखान्यात घडली. याप्रकरणी निष्काळजीपणाबाबत कारखान्याच्या मालकासह चौघांविरोधात एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुपम घोष असे मयत कामगाराचे नाव आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झवेरी बाजारातील तेलगल्ली परिसरात असलेल्या सोन्यावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यात ही दुर्घटना घडली. मन्सूर अली शेख यांच्या मालकीच्या या कारखान्यात वायर कटिंग मशीन कारखान्याच्या आवारात मध्यभागी ठेवण्यात आले होते. या मशिनजवळच मूळचे पश्चिम बंगालचे असलेले आठ कामगार बसतात.
सर्व कामगार कारखान्यातच राहत होते. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून सर्वजण कारखान्यात झोपले होते. रात्री अंथरुणावर कामगारांची एकमेकांसोबत थट्टामस्करी सुरू असताना एका कामगाराचा पाय चुकून मशिनला लागला. यामुळे मशिन अनुपम घोष आणि सौम्या रॉय यांच्या अंगावर पडली. यात दोघेही जखमी झाले.
अन्य कामगारांनी तात्काळ त्यांना जीटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान अनुपमचा मृत्यू झाला तर उपचारानंतर सौम्याची प्रकृती स्थिर आहे. सौम्या रॉय हिच्या फिर्यादीवरून एलटी मार्ग पोलिसांनी कारखाना मालक मन्सूर अली शेख, कामगार मंगला मंडल आणि स्वरूप घोष आणि जागा मालक उत्तम माळी आणि अजित चेड्डा यांच्याविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.