मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग डेडलाइन पुन्हा हुकणार, अनेक पुलांची कामे अद्याप अपूर्णच

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत 2024 पर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन कोकणातील जनतेला देण्यात आले होते, मात्र सध्या सुरू असलेले महामार्गाचे काम कासवगतीने सुरू असून या संदर्भमार्गावरील अनेक पुलांची कामे अद्याप अपूर्णच आहेत. या महामार्गावरील कामे पूर्ण होण्यास कमीत कमी तीन ते चार वर्षे लागण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे डिसेंबर 2024 ही डेडलाइन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. मात्र नागेठणे, कोलाड, पुई, माणगाव येथील प्रमुख पुलांचे काम अर्धवट आहे. पळस्पे ते इंदापूर हा तब्बल 84 किलोमीटरचा रस्ता सर्वात तापदायक होता. याचे दोन टप्प्यांत विभाजन केल्यानंतर पळस्पे ते कासूपर्यंत काम होत आले आहे. मात्र त्यानंतर काम पूर्ण ठप्प झाले आहे. माणगाव बायपासचे काम न केल्याने ठेकेदार ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामादरम्यान 100 वॉर्डन्स लावण्यासदंर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे. त्याच्या पुढच्या रस्त्याचे काम हे एलएनटीकडे असून बहुतांश काम पूर्ण झाले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम हे 2010 पासून संथगतीने सुरू आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाचे काम होण्यासाठी कोकणकरांच्या जनआक्रोष समितीने माणगाव येथे आमरण उपोषण केले होते याची दखल प्रशासनाने घेतली होती, तसेच माणगाव येथे प्रशासकीय कार्यालयाला पत्र देऊन दिंडीही काढण्यात आली होती. तरीही ठेकेदारांनी हा महामार्ग रखडवला आहे. या अपूर्ण महामार्गाने त्रस्त कोकणकर पुन्हा आंदोलनाच्या मार्गावर असून पुढील नियोजनाबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

निधी उपलब्ध; तरीही काम रखडले

याबाबत जनआक्रोश समितीकडून वारंवार सांगण्यात येत आहे की, रोज अपघात होत आहेत, परंतु अपघातग्रस्तांना शासनाची कुठलीही मदत मिळत नाही. दळणवळणालाही मोठा फटका बसत आहे. सुरुवातीला मुंबई-गोवा महामार्ग हा बीओटी तत्त्वावर बांधला जाणार होता; मात्र या महामार्गासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे, परंतु दोन-चार ठेकेदारांनी पळ काढल्याने महामार्गाचे काम रखडले आहे.