![Kharadi-Shirur flyover](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/accident-1-696x447.jpg)
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माउली कटके यांनी गेल्या काही दिवसांत पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूककोंडीच्या समस्येवरती उपाययोजना म्हणून रस्त्यालगतचे अतिक्रमण हटवले आहे. त्यामुळे कोंडीतून वाहनचालकांची काहीशी सुटका झाली आहे. या मार्गावर खराडी बायपास ते शिरूरदरम्यान तीन मजली उड्डाणपूल होणार असून, त्याचे काम मार्चच्या अखेरीस सुरू होणार असल्याचे आमदार कटके यांनी सांगितले.
बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खराडी बायपास ते शिरूर या अत्याधुनिक एलिव्हेटेड उड्डाणपुलाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. राज्यातील पहिला अत्याधुनिक एलिव्हेटेड फ्लायओव्हर प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे खराडीपासून शिरूरपर्यंत तयार केला जाणार आहे. भूसंपादनापूर्वी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला ठरवून देणे आदी कामांकरिताचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आले असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मार्च 2025 मध्ये सुरू करण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे, असे आमदार कटके यांनी सांगितले.
मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ विभागाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांच्याशी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिरूर-हवेली मतदारसंघासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या या 60 कि.मी. लांबीच्या प्रकल्पाची तातडीने सुरुवात करण्याबाबत संबंधित विभागानेही सकारात्मकता दर्शविली आहे. या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे ज्यावरून महामेट्रो त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरून चारचाकी वाहने आणि तळातील रस्त्यावरून अवजड वाहतूक व्यवस्था असणार आहे.
खराडी, लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगाव आणि शिरूर या पाच ठिकाणी उड्डापुलाला बाह्यमार्ग असणार आहे. या तीन मजली उड्डाणपुलामुळे महामार्गावरील वाहतूककोंडीची समस्या कायमची मार्गी लागणार असल्याचे आमदार कटके यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांकरिता भूसंपादनापूर्वी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. राज्य शासन शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देणार असून, या कामाला प्रत्यक्षात मार्च महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर पुणे शहरातील वाहतुकीवरील ताणही कमी होणार आहे. याबाबत राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत असून, शिरूर-हवेली मतदारसंघातील सर्वात मोठा प्रकल्प मंजूर झाला असल्याचे समाधान आहे, असे आमदार कटके यांनी सांगितले.