मुंबईत वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने धडक कारवाई सुरू केली असून जी/साऊथ वरळी आणि एफ/साऊथ परिसरातील प्रदूषणकारी बांधकामांचे ‘काम बंद’ची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. मुंबईत होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने घालून दिलेली 29 प्रकारची नियमावलीचे बांधकाम कंत्राटदारांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत सुरू असलेल्या पाच हजारांवर सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणाहून उडणारी धूळ हे प्रदूषणाचे प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष हवामानतज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गतवर्षी पालिकेने कठोर कारवाई करीत 15 ऑक्टोबर रोजी 27 प्रकारची नियमावली जाहीर केली आहे. यानुसार पालिकेने पालिकेच्या वॉर्ड स्तरावर सब इंजिनीयरच्या टीमच्या माध्यमातून बांधकामांची पाहणी करून प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावली पाळण्यात आली नसल्यास कारवाई करण्यात येत आहे.
जी/साऊथ वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी आणि एफ साऊथ माटुंगा, वडाळा, अॅण्टॉप हिल परिसरात एकूण आठ बांधकामांना ‘स्टॉप वर्क’ नोटीस दिल्याची माहिती पालिकेने दिली. आगामी काळात ही कारवाई वेगाने करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक घेऊन प्रदूषणकारी प्रकल्पांवर कारवाई वाढवण्याचे निर्देशही दिले.
अशी आहे नियमावली
संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपडय़ाने झाकलेले असावे, बांधकामाच्या ठिकाणी स्प्रिंकलर असावेत, धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान 4-5 वेळा पाण्याची फवारणी करावी.
धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान 35 फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे.