90 तास काम करा, 30 ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य गाठा!

हिंदुस्थानला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर आठवडय़ाला तब्बल 80 ते 90 तास काम करावे लागेल असे मत निती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी मांडले आहे. हिंदुस्थानला महासत्ता बनवण्यासाठी नागरिकांना प्रचंड मेहनत करावी लागेल. त्यामुळे हिंदुस्थानी नागरिकांनी आठवडय़ाला किती तास काम करायला हवे यावर सुरू असलेल्या वादविवादात आता कांत यांनी उडी घेतली आहे.

कामाच्या तासावरून सुरू असलेल्या वादविवादात हिंदुस्थानच्या वतीने जी 20 शेरपा म्हणून सहभागी झालेल्या कांत यांनी सांगितले की, जपान, दक्षिण कोरिया आणि चीनने आपल्या मजबूत कार्य धोरणाच्या माध्यमातून आर्थिक यश मिळवले आहे. हिंदुस्थानला जर जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्था बनायचे असेल तर अशाच प्रकारची मानसिकता ठेवावी लागेल यावर त्यांनी जोर दिला.

मेहनत करू नका म्हणणे फॅशन बनलेय

प्रचंड मेहनत करू नका असे बोलणे आता फॅशन बनले आहे, परंतु का? हिंदुस्थानी नागरिकांनी प्रचंड मेहनत केलीच पाहिजे असे कांत यांनी नमूद केले. वेळ आणि खर्च याशिवाय जागतिक स्थरावर विविध योजना किंवा प्रकल्प मार्गी लागू शकत नाहीत. आपल्याला ही कला अवगत करायला हवी, असे कांत म्हणाले.

स्वतःसाठी दीड तास वेगळा ठेवा

मी रोज प्रचंड काम करतो, व्यायाम करतो, गोल्फ खेळतो तरीही कष्ट करतो. स्वतःसाठी एक ते दीड तास वेगळा काढा. अशा प्रकारे तुम्हाला दिवसाला साडेबावीस तास कामासाठी मिळतील. तुम्हाला काम आणि आयुष्याचा समतोल साधता येऊ शकतो, परंतु प्रचंड मेहनत करू नका असे म्हणून त्याची फॅशन बनवू नका, असे आवाहनही कांत यांनी केले आहे.