महिला टी-20 वर्ल्ड कपचे तिकीट फक्त 114 रुपयांत, क्रिकेटप्रेमींना आकर्षित करण्यासाठी आयसीसी सज्ज

आयसीसीने महिला टी-20 वर्ल्ड कपदरम्यान मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमींना आकर्षित करण्यासाठी अवघ्या 5 दिरहम म्हणजेच 114 रुपयांचे स्वस्त तिकीट ठेवले आहे. त्यामुळे येत्या 3 ते 20 ऑक्टोबरदरम्यान ही स्पर्धा यूएईच्या दुबई आणि शारजाह येथील मैदानांवर खेळविली जाणार आहे.

पुरुष क्रिकेटच्या तुलनेत महिला क्रिकेटची लोकप्रियता फारच कमी आहे. त्यांच्या सामन्यांना आजही मोठ्या संख्येने प्रेक्षक येत नाहीत. मात्र आगामी महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये महिलांची फटकेबाजी पाहायला प्रेक्षकांची उपस्थितीही जोरदार असावी म्हणून आयसीसीने अवघ्या 5 दिरहमचे तिकीट ठेवले आहे. जे कुणीही सहज विकत घेऊ शकतो.

तसेच शालेय आणि महाविद्यालयात शिकत असलेल्या 18 वर्षांखालील मुले-मुलींना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. जेणेकरून मैदानात प्रेक्षकांची उपस्थिती उत्साहवर्धक असावी. आज एका लेझर शो कार्यक्रमाने प्रतिष्ठत बुर्ज खलिफा येथे वर्ल्ड कप तिकिटांचे अनावरण करण्यात आले.

महिलांच्या 10 संघांचा समावेश असलेली स्पर्धा यूएई आयोजित करणे म्हणजे अवघ्या जगाला एका मंचावर आणण्यासारखे आहे. तसेच हा वर्ल्ड कप यूएईच्या घरचा वर्ल्ड कप आहे. त्यामुळे खेळाडूंसह क्रीडाप्रेमीही उत्साहात आहेत. त्यांच्या उत्साहात आणखी भर पडावी म्हणून तिकिटे स्वस्त केल्याची माहिती आयसीसीने दिली.

अवघ्या 20 दिवसांवर असलेला हा टी-20 वर्ल्ड कप 18 दिवस खेळला जाणार असून यात एपंदर 23 सामने खेळले जातील. दहा संघांना दोन गटात विभागण्यात आले असून ‘अ’ गटात ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थान, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या चार आशियाई संघांचा समावेश आहे.

‘ब’ गटात बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि स्कॉटलंड हे संघ एकमेकांशी भिडतील. ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जाणार असून प्रत्येक संघ चार संघांविरुद्ध खेळतील. त्यानंतर दोन्ही गटांतील दोन अव्वल संघ बाद फेरीत पोहोचतील. 17 ऑक्टोबरला दुबईत आणि 18ला शारजात उपांत्य फेरीचा सामना रंगेल. अंतिम सामना 20 ऑगस्टला दुबईत खेळला जाईल.