
दिवसेंदिवस रॉकेट वेगाने क्रिकेट जगतात आपले पंख पसरविणाऱ्या महिला क्रिकेटची टी-20 अर्थातच महिला प्रीमियर लीगची (डब्ल्यूपीएल) फटकेबाजी उद्या, शुक्रवारपासून वडोदऱयाच्या मैदानात सुरू होतेय. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुजरात जायंट्सशी भिडेल आणि त्याचबरोबर 30 दिवसांत 22 सामन्यांच्या थराराला प्रारंभ होईल.
महिला क्रिकेटला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱया डब्ल्यूपीएलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यंदाही या स्पर्धेत महिला क्रिकेटमधील धडाकेबाज फलंदाज आणि गोलंदाज आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्यासाठी वडोदऱयात दाखल झाल्या आहेत. या स्पर्धेतील सुरुवातीचे सहा सामने वडोदऱयाच्या कोटंबी स्टेडियममध्ये खेळले जातील, तर 8 लढती बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहेत. लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर चार सामने खेळविले जाणार असून शेवटच्या दोन साखळी सामन्यांसह एलिमिनेटर आणि अंतिम सामना ब्रेबर्नवर रंगेल. पाच संघांच्या या स्पर्धेत प्रत्येक संघ आठ सामने खेळेल. यात गतविजेत्या आरसीबीसह गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा समावेश आहे.