संस्कृती बिंस्कृती – बाईपणाची गोष्ट

>> डॉ. मुकुंद कुळे

बाईच्या धीराची, कर्तृत्वाची, सर्जनाची आणि भोगाची अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. मात्र बाईपण हे कोणत्याही वर्णना-विशेषणापल्याडचं आहे. बाईपण ही शब्दांत पकडता येणारी गोष्ट नाही, ती अनुभवण्याचीच गोष्ट आहे… आणि ते अनुभवण्यासाठी स्त्रीचं शरीरच असायला हवं असं नाही, केवळ मनानेही त्याची अनुभूती घेता येतेच!

गेली काही वर्षे निमित्तानिमित्ताने कला क्षेत्रातील आया-बायांची आयुष्यं पाहतोय, ऐकतोय, वाचतोय आणि हैराण होतोय. त्यांचं नाव कधी उमराव असतं, कधी बेगम, कधी बडी मोतीबाई, कधी रसुलनबाई, कधी जद्दनबाई, तर कधी वसंतसेना, आम्रपाली, टी. बालसरस्वतीअम्मा, मेनकाबाई, अंजनीबाई, गोदावरीबाई, भामाबाई. गायन आणि नृत्याचा भारतीय अवकाश उजळून टाकणाऱया या साऱयाजणी काय भन्नाट आयुष्य जगल्यात. त्यांच्या परंपरेला मानलं असेल काहींनी दूषित, बाधित, कलंकित, पण छट् काय फरक पडतो त्याने! झाली असेल त्यांची फरपट आयुष्यात, नसेल जगता आलं त्यांना आयुष्य इतर चारचौघींसारखं, पण फरक काय पडला? आपल्या कैफात जगली यातली प्रत्येक जण. अगदी टेचात. मन आणि शरीर दोन्ही त्यांच्याच ताब्यात तर होतं. क्वचित कधी शरीरावर पडायच्या बळजबरीच्या झडपा, पण तेव्हाही निश्चितच त्यांच्या मनात विठ्ठलभक्त विठेसारखे बोल घुमले असतील, `तुझी सत्ता आहे देहावरी समज, माझेवरी तुझी किंचित नाही.’
अर्थात केवळ या कलावंत महिलाच नाही, तर आई-बहिणींसकट समाजातली प्रत्येकच स्त्री मला कायमच मोठय़ा धीराची वाटत आलीय. क्वचित कधी शारीरिक ताकदीत त्या कमी पडत असतील, परंतु त्यांच्या मनाची ताकद अफाट आणि अचाट असते. त्यांच्या या अचाट ताकदीचे आणि क्वचित काही भोगाचे नमुने पाहू या.

उघड्या अंगाची, तरी फाटक्या तोंडाची!

पूर्वी गावाकडे संध्याकाळी आंघोळ करायची पद्धत होती. सकाळी उठून चहा-न्याहारी झाली की बाई-बाप्यांसकट सगळी माणसं रानात-शेतात जायची. तिथे दिवसभर कामाची उस्तवार व्हायची. साहजिकच मग शरीराबरोबरच मनही थकायचं. संध्याकाळी असं थकूनभागून घरी आल्यावर केलेली आंघोळ सगळ्यांना पुन्हा उभारी द्यायची. बाप्येमाणसांचं एक बरं असायचं. ते आंघोळ करून चहा पिऊन पुन्हा घराबाहेर पडायचे. पण बायका आल्या आल्या घरातल्या कामाला बांधल्या जायच्या. पंचवीसेक वर्षांपूर्वीपर्यंत तसंही घरात न्हाणीघर नसायचं. जिथे केळी लावलेल्या असायच्या, तिथेच न्हाणीचा पसरट दगड ठेवलेला असायचा. त्या पसरट दगडावर उभं राहायचं आणि समोरच ठेवलेल्या छोट्या दगडावर ऊन पाण्याची बादली ठेवून भरकन आंघोळ उरकली जायची. मुलं आणि बाप्ये संध्याकाळी दिवस असतानाच आंघोळी उरकायचे. बायामाणसं मात्र दिवस कलला की केळीच्या वा इतर झाडांच्या आडोशानेच आंघोळी उरकायच्या आणि दिवसभर करकचून बांधून ठेवलेल्या शरीराला मोकळं करायच्या. एरव्हीचं त्यांचं साडी नेसणं आणि संध्याकाळी दिवस मावळल्यावरचं त्यांचं हे नेसणं वेगळं असायचं. घट्ट चापूनचोपून लुगडं नेसण्याऐवजी त्या सैलसर नेसायच्या. ते लुगडं नसायचंच खरं तर, एखादं तोकडं जुनेरं असायचं आणि त्याला फाटाक असं म्हटलं जायचं. महत्त्वाचं म्हणजे फाटाक नेसल्यावर त्यावर अंगात चोळी घालायच्या नाहीत. कमरेपर्यंत फाटाक नेसून त्याचा पदर मानेवरून काढून पुढे कमरेत खोचला जायचा. यात पाठ उघडी राहायची आणि छाती तेवढी झाकली जायची.

लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो की, आईसुद्धा तसंच फाटाक नेसायची. तिला तसं बघून मुंबईतच जन्म गेलेल्या मला सुरुवातीला विचित्र वाटायचं. काकूसुद्धा तसंच फाटाक नेसायची आणि तिला तसं बघून तर मला अजूनच संकोचल्यासारखं व्हायचं. आई काय किंवा काकू काय, एरव्ही त्यांच्याबरोबर दंगामस्ती करताना मला काहीच वाटायचं नाही. पण संध्याकाळी त्यांच्याबरोबर मोकळेपणी बोलतानाही दडपण यायचं. मग एके दिवशी हिय्या करून मी आईला म्हटलंच “आयं, हा असा काय लुगडा नेसताव तुमी संध्याकाळी. मला कसासाच वाटतं.” ती म्हणाली, “बब्या, मनाला मोकला सोडायचा, तसाच शरीराला पण मोकला सोडायची गरज असतं.”

तरीही मला काही ते उमजत नव्हतं. कारण माझं किंवा एक वेळ घरातल्या बाप्येमाणसांचंही ठीक होतं. पण कामानिमित्ताने बाहेरचा कुणी माणूस आला, तरी आई-काकू त्यांच्याशी एरव्हीच्याच सहजतेनं बोलायच्या. म्हणूनच मी आईला पुन्हा म्हटलं, “अगं, पन बाहीरची मानसा येतात, तवा त्यांच्यासमोर असा फाटाक नेसून अवघडल्यासारखा नाय व्हत?” तसा माझा रोख उमगून ती खळखळून हसली नि म्हणाली, “बब्या, कुनाची टाप लागून गेलीय आमच्याकडं वर नदार (नजर) करून बघायची, आमी डोलं नाय हातात काढून ठेवू त्यांच्या!” मग ती फाटाक नेसली असतानाच मी तिला गळामिठी घातली आणि तिचा एक करकचुन मुका घेतला. मनात आलं बाई अशी पाहिजे उघड्या अंगाची, तरी फाटक्या तोंडाची! म्हणजे मग कुणाला कशाला हिंमत होतेय बाईला निरखण्याची, पारखण्याची?

कामाख्याचा ऋतुस्राव

आसामच्या कामाख्या मंदिरात दरवर्षी जून महिन्यात अंबुबाची उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव म्हणजे एकप्रकारे तिच्या स्त्रीत्वाचा केला जाणारा सन्मान असतो. म्हणजे या उत्सवाच्या आधी तीन दिवस तिला ऋतुप्राप्ती होत असल्याचं मानलं जातं आणि चौथ्या दिवशी ती न्हाते तो व पुढचे काही दिवस अंबुबाची उत्सव साजरा केला जातो. दरवर्षी साधारणपणे 22 ते 25 जून या कालावधीत हा उत्सव होतो. या उत्सवाच्या बातम्या यायला सुरुवात झाली की मला आई आठवते. रुढार्थाने आईचा आणि कामाख्याचा काहीच संबंध नाही. अर्थात नाही तरी कसं म्हणू, त्या दोघीही स्त्रिया, म्हणजे एकाच जातीच्या नाही का? साहजिकच त्यांचा एकमेकींशी बाईपणाचा संबंध तर आहेच आहे… आणि असली एक देवी नि एक साधी बाई म्हणून काय बिघडलं? त्यांचे शरीरभोग तर सारखेच होते. मासिक पाळीला दोघींनाही सामोरं जावं लागलं आणि कामाख्याला तर अजून जावं लागतंय.

पण हे पावसाळ्यातले चार दिवस केवळ कामाख्याच्याच ऋतुप्राप्तीचे नसतात, ते निसर्गाच्याही ऋतुप्राप्तीचे असतात. म्हणजे पावसाळा सुरू होतो आणि नदी-नाले पूर येऊन वाहू लागतात. कालपर्यंत निवळशंख असलेलं पाणी बघता बघता गढूळ होऊन जातं. मासिक पाळीत बाईचा लाल-काळा स्राव झरावा तसा, तर मोठेपणी एकदा कधी तरी मी पावसाळ्यात गावी गेलो होतो आणि तुफान पाऊस पडत होता. आमच्या गावच्या केसरी नदीला बघता बघता महापूर आला होता. खरं तर घराच्या पडवीत उभं राहिलं तरी नदीला आलेला पूर सहज दिसायचा, पण त्या दिवशी काय मनात आलं कुणास ठाऊक, आईला म्हटलं, “आयं, चल नह्यचा हहूर बघून यव.” आईने आधी आढेवेढे घेतले. एवढ्या पावसात कशाला बाहेर पडायचं म्हणत तिने मला थांबवण्याचा प्रयत्नही केला.

मात्र कदाचित तिलाही भरलेली नदी पाहायची असावी. मग एकाच छत्रीत आम्ही दोघेही बाहेर पडलो. वाऱयाचा जोर एवढा होता की, त्याला थोपवताना आमची भंबेरी उडत होती. आमच्या घरापासून मोजून पाचशे ते सहाशे पावलं टाकली असतील, तर नदीचा पूर एकदम हाकेच्या अंतरावरच आला. नदीचं ते भयानक रूप घाबरवणारं होतं. नदीचं नितळ रूप पालटलं होतं. तिच्यातलं पाणी रोरावत अंगावर आल्यासारखं धावत होतं. मुख्य म्हणजे ते अगदी गढुळलेलं होतं, एकदम मातकट. माझ्या तोंडून पटकन बाहेर पडलु, “आयं, नह्यचा पाणी बघ कसा गदाळलाय… श्शी!”

त्यावर ती पटकन माझ्यावर डाफरली. तिने आधी नदीकडे पाहून हात जोडले आणि मग माझ्याकडे पाहून म्हणाली, ‘बब्या, हहूर आलेल्या नह्यला असा नाव ठेव नये. तिला ऋतू आलाय नं म्हणून तिचा पानी गदाळलाय. आम्हा बायकांना ऋतू येतं तवाच जीव जलम धरतं नं. नह्यचा पण तसाच.” कामाख्याच्या ऋतुप्राप्तीची बातमी वाचली की, तिच्या कथेला निसर्गाच्या ऋतुप्राप्तीचा असलेला संदर्भ पुन्हा नव्याने आठवतो आणि मग आईची आठवण येते. आईनेही नदीला स्त्रीच्या शरीरधर्माशीच जोडून घेतलं होतं की, शेवटी नदी काय, कामाख्या काय आणि आई काय, अवघं बाईपणच सर्जनशील असतं!

सर्जनमूर्ती रेणुका

एकदा भल्या पहाटे रेणुका नित्याप्रमाणे नवऱ्याच्या म्हणजे जमदग्नीच्या पूर्जेअर्चेसाठी पाणी आणायला गेली. पाणी भरण्यासाठी ती नदीत उतरणार एवढ्यात तिच्या नजरेला चित्ररथ गंधर्वाची अन् त्याच्या स्त्रियांच्या कामोन्नत जपीडा पडल्या. ती जपीडा पाहून क्षणभर ती मोहीत झाली आणि तिचं सारं शील-सत्त्व लयाला गेलं म्हणे. केवळ तेवढ्या कारणाने जमदग्नीने तिला स्वैराचारी ठरवून आपल्या पुत्रांनाच मातेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. पहिल्या तीन पुत्रांनी दिला नकार मातेचा शिरच्छेद करायला, पण चौथा जामदग्नी म्हणजे परशुरामाने केलं लगेच पित्याच्या आज्ञेचं पालन पितृकर्तव्य म्हणून. मातेचा दोष काय, असं विचारण्याचं साधं सौजन्यही त्याने दाखवलं नाही. मात्र मातेचा शिरच्छेद केल्यावर प्रसन्न होऊन पित्याने वर माग म्हणताच, त्याने पुन्हा रेणुकेला जिवंत करण्याची मागणी केली. म्हणजे परशुरामाने दोन्हीकडून डाव साधला. एकीकडे पित्याच्या आज्ञेचं पालन करून पित्यालाही खूश केलं आणि मातेला जिवंत करण्याचा वर मागून मातृप्रेमीही ठरला.

…पण रेणुका नाहीच झाली जिवंत पूर्ण रूपाने. कारण आपलं काय चुकलं, हेच तिला कळलं नाही शेवटपर्यंत. चित्त चळलं हे तिलाही मान्य होतंच. मात्र आपण परपुरुषाची इच्छा बाळगली नाही, यावरही ठाम होती ती. त्यात नवरा आणि मुलगा दोघांनीही एकप्रकारे अविश्वासच दाखवला तिच्यावर. ही खंत असेलच तिच्या मनात. बहुधा म्हणूनच पुन्हा जिवंत होण्याची संधी चालून आलेली असतानाही ती नाहीच झाली पूर्ण जिवंत. जगाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्जनभागाला तिने चैतन्य दिलं, पण मनाचा कायम दगडच केला. कदाचित आपल्या मनीच्या वेदना कुणाला कळणार नाहीत असंच तिला वाटलं असेल. अर्थात मनाचा दगड करताना सर्जनाचा उत्सव करायला ती विसरली नाही. ती प्रकटही झाली त्याच जननेंद्रियाच्या रूपात. खरं तर सर्जनशीलता हाच रेणुकेचा विशेष होता. गर्भात पडलेलं कसलंही बी रुजवण्याची क्षमता असलेली भूमीच तर होती रेणुका.

परंतु रेणुकेचं ते रूप लपवण्याकडेच समाजपुरुषाचा कल असतो किंबहुना त्यात त्यांचा डाव असतो. रेणुका मुळातच भूमी म्हणजे सर्जनतत्त्व धारण करणारी योनी असल्यामुळे ती लौकिकात जिवंत राहिली ती जननावस्थेतील रूपातच. मात्र स्त्रीचं-मातेचं हे जननस्थानदेखील पुरुषांना लाजिरवाणं वाटलं. पुराणात रेणुकेचं जन्मजात सर्जनत्व लक्षात न घेता तिला व्यभिचारी ठरवून जमदग्नीने तिचा शिरच्छेद करायला लावला आणि आता कलियुगात सर्जनाचं प्रतीक असलेल्या रेणुकेच्या जननस्थानाला शेंदूर फासून त्याला मुखवट्याचा आकार देण्यात आलाय. म्हणजे दोन्हीकडे तिच्या सर्जनाचा संकोचच! बाईपणाचे भोग सगळीकडे सारखेच असतात!

(लेखक लोकसंस्कृती व लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत)