
आजवर माझे खूप सन्मान झाले, पण आजचा सन्मान स्वीकारताना मला माझ्या आईची आठवण झाली. या पुरस्काराचे नाव ‘ममता’ आहे आणि तो रश्मी वहिनी यांच्या हस्ते स्वीकारताना मी गहिवरून गेले. मी सामाजिक कार्याला सुरुवात केली तेव्हा माझी आई माझ्या पाठीशी उभी राहिली. आज शिवसेना आणि जाणीव ट्रस्ट त्याच जाणिवेने माझ्या पाठीशी आईसारखी उभी राहिली त्याबद्दल मी आभारी आहे, असे भावोद्गार कविता गोबाडे यांनी काढले.
शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत महानगर टेलिफोन निगम कामगार संघाद्वारे संचालित ‘जाणीव ट्रस्ट’तर्फे दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे ‘ममता पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा हा सोहळा शुक्रवारी शिवाजी महाराज मैदान येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृह येथे संपन्न झाला. या सोहळ्यात लातूर जिह्यातील भटक्या विमुक्त, आदिवासी महिलांसाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कविता गोबाडे यांचा रश्मी ठाकरे यांच्या हस्ते माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे ‘ममता’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानपत्र, 51 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी उपनेत्या, माजी महापौर विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, उपनेत्या संजना घाडी, माजी महापौर महिला संघटक श्रद्धा जाधव, उपनेत्या शीतल देवरुखकर-शेठ, विभाग संघटक शुभदा शिंदे, माजी नगरसेविका प्रीती पाटणकर, वृशाली सावंत, रजनी वैती, शामली राजवटकर, वैशाली थोरात, स्मिता तेंडुलकर, कल्याणी सावंत आणि महानगर टेलिफोन कामगार संघाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
‘स्वरजल्लोष’ने वाढवली कार्यक्रमाची रंगत
यावेळी सपना हेमण प्रस्तुत संपूर्ण महिलांच्या वाद्यवृंदाने ‘धमाल स्वरजल्लोष’ हा बहारदार संगीत कार्यक्रम सादर केला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन समीरा गुजर यांनी केले.