भाजपच्या कार्यक्रमात साडी घेण्यासाठी महिलांची झुंबड, महिलांनी लुटल्या साड्या

नांदेडमध्ये भाजपने लाडक्या बहिणीचा देवा भाऊ कार्यक्रम आजोजित केला होता. या कार्यक्रमात साडी वाटप करण्यात आले. पण साड्या घेण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती. ज्या महिलांना साडी नाही मिळाली त्या महिलांनी अक्षरशः साड्या लुटल्या.

विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना हदगाव मतदारसंघात भाजपाचे भागवत देवसरकर यांनी तामसा येथे लाडक्या बहिणीचा देवाभाऊ या उपक्रमातंर्गत साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी दोन हजार साड्या वाटप करण्याचे आयोजकांनी सांगितले होते. मात्र उपस्थित महिलांची संख्या जास्त झाल्याने साड्या कमी पडल्या आणि याठिकाणी साड्या घेण्यासाठी महिलांची एकच गर्दी उडाली. साड्या वाटपापूर्वीव हा कार्यक्रम आयोजकांना बंद करावा लागला. अनेक महिला साड्या न घेताच परत निघून गेल्या. सकाळपासून साड्या घेण्यासाठी या महिला तामसा येथे हजर झाल्या होत्या. परंतु साड्या न मिळाल्याने त्यांचा हिरमोड झाला. अनेक महिलांनी जबरदस्तीने साड्या घेऊन पोबारा केला.

अनेक महिलांनी सांगितले की आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून आयोजकांच्या सांगण्यावरुन कार्यक्रमस्थळी आलो होतो, मात्र अनेकांना साड्या न मिळाल्याने आमचा हिरमोड झाला. याबद्दल आयोजकांचा निषेधही महिलांनी केला.

आजच्या या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.किशोर देशमुख, बाळासाहेब पांडे, आयोजक भागवत देवसरकर आदींची उपस्थिती होती. मात्र कार्यक्रमात गोंधळ झाल्याने अनेक महिलांना साड्या कमी पडल्याने तेथून परतावे लागले.