आशियाई महिला हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत पुन्हा एकदा ‘चक दे इंडिया’चा नारा घुमला. गतविजेत्या यजमान हिंदुस्थानने बलाढय़ चीनचा कडवा प्रतिकार 1-0 ने मोडून काढत विजेतेपद राखण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानी महिलांचे हे तिसरे विजेतेपद ठरले हे विशेष!
पहिल्या मिनिटापासून अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत उभय संघांनी पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकमेकांवर अनेक हल्ले- प्रतिहल्ले केले, मात्र तरीही मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटू शकली नाही. तिसऱया क्वार्टरला सुरुवात होताच अवघ्या 30 सेकंदांत हिंदुस्थानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. दीपिकाने या संधीचे सोने करत गोल केला. या गोलमुळे हिंदुस्थानी प्रेक्षकांमध्ये एकच उत्साह संचारला.
चौथ्या क्वार्टरमध्येदेखील चिनी खेळाडूने चूक केली, मात्र यावेळी चिनी गोलरक्षिकेने हा गोल अडवून हिंदुस्थानी चाहत्यांना निराश केले. चिनी खेळाडूंनी अखेरच्या टप्प्यात हिंदुस्थानी गोलपोस्टवर हल्ले करत गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र हिंदुस्थानी खेळाडूंनी बचावात्मक पवित्रा घेत विजय हातातून निसटणार नाही याची काळजी घेतली. दीपिकाने संपूर्ण स्पर्धेत 11 गोल केले, तर हिंदुस्थानची स्पर्धेतील एकूण गोलसंख्या 29 ठरली. याचबरोबर हिंदुस्थानी महिलांनी 2016 च्या जेतेपदाची पुनरावृत्ती केली.
जपानला तिसरे स्थान
स्पर्धेत तिसऱया स्थानासाठी झालेल्या लढतीत जपानने मलेशियाचा 4-1 गोलफरकाने धुव्वा उडविला. जपानला उपांत्य फेरीच्या लढतीत मंगळवारी हिंदुस्थानकडून 0-3 असा पराभव सहन करावा लागला होता.