महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या अंतिम फेरीत चीनचा पराभव करून हिंदुस्थानने जेतेपद पटकावले आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात टीम इंडियाने विजेतेपद पटकावण्याची ही तिसरी वेळ आहे. हिंदुस्थानकडून सामन्यातील एकमेव गोल दीपिकाने 31व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरमध्ये केला. बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अंतिम सामना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतही खेळाडूंचा प्रचंड उत्साह होता.
हिंदुस्थान आणि चीन यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पहिले दोन क्वार्टर गोलशून्य राहिले. म्हणजेच हाफ टाईमपर्यंत कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. मात्र तिसऱ्या क्वार्टरला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच मिनिटाला टीम इंडियाने पेनल्टी कॉर्नर मिळाला, ज्याचे दीपिकाने गोलमध्ये रूपांतर केले.
या स्पर्धेपूर्वीच सलीमा टेटे हिला हिंदुस्थानी संघाचे कर्णधार बनवण्यात आलं होतं. तिच्या पहिल्याच प्रोजेक्टमध्ये तिने टीम इंडियाला चॅम्पियन बनवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. चीनने शेवटच्या क्षणापर्यंत गोल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शेवटच्या क्षणी मैदानावरील 11व्या खेळाडूसह गोलकीपरला बदललं. असं केल्यानंतरही चिनी संघाला एकही गोल करता आला नाही.