महिला आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा; विजयाच्या हॅटट्रिकसह हिंदुस्थान उपांत्य फेरीत, नेपाळला 82 धावांनी चारली धूळ

हिंदुस्थानी महिलांनी विजयाच्या हॅटट्रिकसह महिला आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. लागोपाठ तिसरा विजय मिळविताना हिंदुस्थानने नेपाळला 82 धावांनी धूळ चारली. शेफाली वर्मा व दयालन हेमलता यांची शतकी सलामी व त्यानंतर गोलंदाजांनी केलेला टिच्चून मारा ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. शेफाली वर्मा या सामन्याची मानकरी ठरली.

हिंदुस्थानी महिला संघाकडून मिळालेल्या 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळचा डाव 9 बाद 96 धावसंख्येवर मर्यादित राहिला. त्यांच्याकडून सीता राणा मगर (18), कर्णधार इंदू बर्मा (14), रुबिता छेत्री (15) व बिंदू रावल (नाबाद 15) यांनाच फक्त दुहेरी धावा करता आल्या, मात्र यातील कोणालाच धावांशी विशीही गाठता आली नाही. हिंदुस्थानकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 फलंदाज बाद केल्या. अरुंधती रेड्डी व राधा यादव यांनी 2-2, तर रेणुका सिंगने एक बळी टिपला. दरम्यान, नाणेफेकीचा काwल जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानी महिलांनी 3 बाद 178 अशी आव्हानात्मक धावसंख्या  उभारली. शेफाली वर्मा (81) व दयालन हेमलता (47) यांनी 14 षटकांत 122 धावांची खणखणीत सलामी दिली.