महिला आशिया चषक स्पर्धा, हिंदुस्थानने चारली पाकिस्तानला धूळ

हिंदुस्थानच्या महिला संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत महिला आशिया चषक स्पर्धेच्या अभियानाची दणक्यात सुरुवात केली आहे. हिंदुस्थानी महिला संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला खरा; मात्र हा निर्णय कर्दनकाळ ठरला. हिंदुस्थानी महिला संघातील गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱयापुढे पाकिस्तानचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अवघ्या 108 धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून सिद्रा आमीन 35 चेंडूत 25 धावा, तौबा हसन19 चेंडूत 22 धावा, तर फातिमा सनाने 16 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले. या तिघांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने शंभरी पार केली. हिंदुस्थानच्या दीप्ती शर्मा हिने 4 षटकांत 20 धावा देत 3 गडी बाद केले; तर रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

पाकिस्तानने दिलेल्या 109 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हिंदुस्थानच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली. शेफाली वर्मा, स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 85 धावांची दमदार भागीदारी रचली. शेफालीने 29 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 40, तर स्मृतीने 31 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 45 धावांची खेळी करून हिंदुस्थानला विजयाच्या समीप नेले. त्यानंतर हेमलताने 11 चेंडूत 14 धावांची खेळी करून हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानकडून सायबा शहा हिने 3 षटकांत 9 धावा देत 2 गडी बाद केले.