
पुरुषांच्या पाठोपाठ टीम इंडियाच्या महिलांनी सुद्धा आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. महिला आशिया चषक 2024 च्या सेमी फायनलमध्ये बांग्लादेशचा 10 विकेटने पराभव करत टीम इंडियाने दणक्यात फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये बांग्लादेशचा धुव्वा उडवला आहे. बांग्लादेशने दिलेले 81 धावांचे लक्ष टीम इंडियाची सलामीजी जोडी स्मृती मानधाना आणि शफाली वर्मा यांनी 11 व्या षटकात पूर्ण करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. स्मृती मानधानाने ताबडतोब फलंदाजी करत 39 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 55 धावांची वादळी खेळी केली. स्मृतीला शफालीने चांगली साथ दिली, शफालीने 28 चेंडूंमध्ये 26 धावा करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलला.
दांबुलामध्ये रंगलेल्या पहिल्या उपांत्य फेरीत बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीपुढे बांग्लदेशच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. बांग्लादेशकडून कर्णधार निगार सुलतान (32 धावा) आणि शोर्णा अक्तर (19 धावा) यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही. 20 षटकांच्या समाप्तीनंतर बांग्लादेशला फक्त 80 धावा करण्यात यश आले. टीम इंडियाकडून रेनुका सिंग आणि राधा यादव यांनी प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या, तर पुजा वस्त्राकर आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. सेमी फायनलचा दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे 28 जुलै रोजी फायनलमध्ये कोणता संघ टीम इंडियाशी दोन हात करणार हे लवकरच निश्चित होईल.