Women’s Ashes 2025 – ऑस्ट्रेलियाच्या महिलांचा ऐतिहासिक कारनामा, इंग्लंडचा केला सुपडा साफ; पहिल्यांदाच झाला असा विक्रम

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या महिला संघांमध्ये मल्टी-फॉरमॅट स्वरुपात Ashes-2025 मालिका पार पडली. तीन टी-20, तीन वनडे आणि एक कसोटी सामना असे या मालिकेचे स्वरुप होते. ऑस्ट्रेलियाच्या संघाने तीन्ही फॉरमॅटमध्ये धमाकेदार प्रदर्शन करत इंग्लंडचा एकतर्फी धुव्वा उडवला आहे. 16 गुणांची कमाई करत ऑस्ट्रेलियाने ही मालिका खिशात घालत इतिहास रचला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये मालिकेतील एकमेव कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 170 धावांमध्ये तंबुत परतला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी करत 440 धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाने उभा केलेला डोंगर भेदण्यात इंग्लंडचा संघ अयशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडचे फलंदाज टिकू शकले नाही. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संपूर्ण संघ 148 या धावसंख्येवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 122 धावांनी सामन्यासह मालिका जिंकली. याचसोबत ही मल्टी-फॉरमॅट मालिकाही ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे.

Ashes-2025 या मल्टी फॉरमॅटम मालिकेमध्ये एकूण 7 सामने खेळवण्यात आले. मालिकेतील सर्व सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. इंग्लंडला एकही सामना जिंकता आलेला नाही. वनडे आणि टी20 सामन्यांमध्ये प्रत्येकी 2 गुण आणि कसोटी सामन्यामध्ये 4 गुण अशा प्रकारे एकूण 16 गुणांची कमाई करत ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिका जिंकली आहे. यापूर्वी अशा पद्धतीने एकतर्फी अ‍ॅशेस मालिका कोणत्याच संघाला जिंकता आलेली नाही. परंतु ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने हा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.