गृहमंत्र्यांच्या शहरात महिला असुरक्षित; नागपुरात दोन वर्षांत बलात्काराच्या 500 घटना

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात महिला सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. नागपूरमध्ये गेल्या पाच वर्षांत तब्बल 1 हजार 93 बलात्काराच्या घटनांची नोंद झाली आहे. गेल्या दोन वर्षांत बलात्काराच्या 500 हून अधिक गुह्यांची नोंद करण्यात आली असून नागपुरातील महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.

बलात्काराला बळी पडलेल्यांमध्ये अल्पवयीन मुली, तरुणी आणि विवाहित महिलांचा समावेश आहे. गेल्या वर्षी सर्वाधिक 252 महिलांवर बलात्कार झाल्याची नोंद पोलीस विभागाने केली आहे. बलात्काराच्या घटनांसह अश्लील चाळे, शेरेबाजी, लज्जास्पद वर्तन आणि विनयभंगाच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. 2019 मध्ये 183 महिला-तरुणींवर बलात्कार झाल्याचे गुन्हे दाखल झाले तर पाच वर्षांत या गुह्यांत 31 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पोलिसांकडून गांभीर्याने तपास नाही

महाराष्ट्राच्या उपराजधानीत बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होऊनही पोलीस विभागाकडून कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचेच चित्र आहे. पोलिसांकडून दोषींना शिक्षा होण्याच्या गांभीर्याने तपास केला जात नसल्याचे दिसून येत आहे. तपासात अनेक त्रुटी असतात. त्याचा लाभ आरोपींना मिळतो. अनेकदा खटले प्रलंबित राहत असल्याने आणि गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतानाही आरोपींवर वचक राहत नाही. 

बलात्काराच्या घटनांमध्ये पोलीस अधिकारीच नकारात्मक भूमिका घेतात. तक्रार महिलांना पोलीस ठाण्यात योग्य वागणूक मिळत नाही. त्याचा विपरीत परिणाम गुन्हे दाखल होण्यावर पडत असल्याचे समोर आले आहे.

अनेक महिलांच्या तक्रारींनुसार गुन्हा दाखल होत नाही. राज्य महिला आयोग किंवा वरिष्ठांनी दखल घेतल्यानंतर गुन्हे दाखल करण्यास गांभीर्य दाखवण्यात येत असल्याचे चित्र अनेकदा असते.

वर्ष           बलात्काराचे गुन्हे

2019   183

2020   172

2021   234

2022   250

2023   252

भाजप नव्हे ही ‘बलात्कारी जनता पार्टी’; काँग्रेसची सडकून टीका  

भाजपची ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ची घोषणा हे ढोंग आहे. ही बलात्कारी जनता पार्टी झाली आहे, अशी टीका काँग्रेसच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा नेत्या डिसुझा यांनी वाराणसीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून केली. मध्य प्रदेशात भाजपाचा प्रचार करत असल्यामुळेच 60 दिवस आरोपींना अटक केली नाही, असा आरोप त्यांनी केला.