राज्यात महिलांवर बलात्कार, लैंगिक अत्याचार, अपहरण, मारहाण, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे लहान चिमुकलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत कोणतीही महिला समाजात सुरक्षित नाही. महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी स्त्रीशक्ती कायदा लागू झालाच पाहिजे, असा आवाज शिवसेनेने उठवला आहे.
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक शासन आणि कायदा अमलात आणण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पनवेल परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांची भेट घेतली. यावेळी रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महानगर समन्वयक दीपक घरत, पुणे शहर संपर्क संघटक स्नेहल आंबेकर, माजी नगरसेविका तथा राजापूर तालुका-संपर्क संघटक समिक्षा सक्रे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक नेहा माने, माजी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्रेया परब, माजी महापौर तथा महिला जिल्हा संघटक कल्पना पाटील, उपजिल्हा संघटक रेवती सकपाळ, तालुका संपर्क संघटक प्रमिला कुरघोडे, तालुका संघटक अनिता डांगरकर, शहर संघटक पनवेल अर्चना कुळकर्णी, शहरप्रमुख प्रवीण जाधव, कुणाल कुरघोडे आदी उपस्थित होते.
अत्याचाराच्या घटनांचा आलेख चिंताजनक
२०२३ मध्ये बलात्काराच्या ७ हजार ५२१ घटना, अपहरणाच्या ९ हजार ६९८ घटना, हुंडाबळीच्या १६९ घटना, क्रूर पद्धतीने त्रासाच्या ११ हजार २२६ घटना, लैंगिक अत्याचार १७ हजार २८१ घटना घडल्या आहेत. तसेच मे २०२४ अखेरपर्यंत बाल लैंगिक अत्याचारसंदर्भात ५०९ गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे.