महिलांच्या सुरक्षेसाठी खास सॅण्डल, उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांचा भन्नाट आविष्कार

महिलांच्या सुरक्षेसाठी खास चप्पल (सॅण्डल) तयार करण्यात आलेय. कुणी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर सॅण्डल 440 वोल्टचा करंट देईल. उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिह्यातील दोन विद्यार्थ्यांनी अनोख्या सॅण्डलची निर्मिती केलेय. अमृत तिवारी आणि कोमल जायसवाल अशी या विद्यार्थ्यांनी नावं असून ती आरपीआयसी शाळेत शिकतात. त्यांनी महिलांची सुरक्षा लक्षात घेता अनोख्या सॅण्डलची निर्मिती केलेय. अमृत-कोमल यांनी तयार केलेल्या सॅण्डलमध्ये एक सेंसर आहे. त्याचे बटण अंगठय़ाच्या खालच्या बाजूस आहे. ते दाबले की सॅण्डलचे लाईव्ह लोकेशन पोलिसांना समजू शकते. याशिवाय यामध्ये एक छोटासा कॅमेरा आणि रेकॉर्डरदेखील आहे. फिचर्स वापरण्यासाठी एक मोबाईल ऑप्लिकेशनदेखील आहे. अॅपच्या मदतीने चप्पलेचे लोकेशन शोधू शकता, शिवाय चपलेमध्ये रेकॉर्ड झालेला सर्व डेटादेखील मिळवू शकता. सॅण्डलची किंमत 2500 रुपये एवढी असेल. सॅण्डलचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये विजेचा झटका देणारे डिव्हाईस फिट केलेले आहे. सॅण्डलमुळे महिलांच्या सुरक्षेत आणखी वाढ होईल असा दावा केला जातोय. सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सॅण्डलला मान्यता दिली आहे.