देशात अलिकडच्या काही वर्षात स्टार्टअपचे प्रमाण वाढलंय. महिलाही मोठ्या प्रमाणात स्टार्टअप सुरू करताना दिसत आहेत. तब्बल 48 टक्के स्टार्टअप कंपन्यांमध्ये कमीत कमी एक तरी महिला संचालकपदावर असल्याचे एका अहवालातून समोर आलंय. महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने ही महत्त्वाची बाब मानली जात आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाला. त्याच्या एक दिवस आधी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्या अहवालानुसार, देशभरात डीपीआयआयटी मान्यताप्राप्त 152139 स्टार्टअप आहेत. त्यातील 73151 स्टार्टअप कंपन्यांमध्ये कमीत कमी एक महिला संचालक आहे. ही संख्या 48 टक्क्यांहून जास्त आहे.
देशातील मोठे स्टार्टअप आणि कंपन्यांची धुरा पुरुषांच्या हाती असताना या क्षेत्रात महिलांचाही दबदबा दिसून येतोय. डिसेंबर 2024 मध्ये डीपीआयआयटीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सुरू झालेल्या 1.57 लाख स्टार्टअपपैकी सुमारे 73 हजार स्टार्टअप असे आहेत, ज्यामध्ये कमीतकमी एक महिला तरी संचालक आहे. हे सरकारमान्य स्टार्टअप आहेत.